परभणी : शिवा संघटनेच्या स्थापनेला २८ वर्ष पूर्ण होत असून या निमित्त २८ जानेवारी रोजी परभणी शहरातील वसमत रोडवरील श्री सारंग स्वामी विद्यालयात संघटनेच्या २८व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शिवा संघटनेने राजकीय पटलावर काम करण्यासाठी सेवा जनशक्ती पार्टी स्थापन केली असून याला नुकतीच निवडणूक आयोगाकडून मंजूरी मिळाली आहे.
सेवा जनशक्ती पार्टीचा १ला वर्धापन दिनही यावेळी साजरा करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील ४० विधानसभा मतदारसंघांमध्ये वीरशैव लिंगायत समाज प्रभावशाली असून राज्यपातळीवरील इतर १६ संघटनांसोबत सेवा जनशक्ती पक्ष म्हणून लवकरच स्वतंत्र भुमिका मांडण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांना चचेर्ची दारे खुली आहेत, अशी माहिती शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
शिवा संघटनेच्या वतीने मंगळवार, दि.१६ जानेवारी रोजी हॉटेल निरज इंटर नॅशनल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवा संघटनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, शिवा संघटना विद्यार्थी आघाडी नांदेड शुभम घोडके, लोहा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवेश्वर धोंडे यांच्यासह जिल्हा मार्गदर्शक उत्तमराव भस्के, जिल्हाध्यक्ष रामेश्वर कुबडे, जिल्हा उपाध्यक्ष दादा कापसे, शहराध्यक्ष कोंडीराम नावकीकर, पालम तालुका मार्गदर्शक नागनाथअप्पा खेडकर, सेलू तालुका मार्गदर्शक दगडय्या मुदकलकर, परभणी तालुका अध्यक्ष शिवा दामोदर, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जनार्दन खाकरे, कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष माधव सोनटक्के, गुलाब बिडकर, संभाजी शेवटे, मयूर पेटे, सूर्यकांत शिवणकर, नरवाडे एम. एस., गंगापूरे डी. एल., थोरात आर. पी., निलंगे नारायण आदी शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. धोंडे म्हणाले की, शिवा संघटनेची २८ जानेवारी १९९६ला नांदेड शहरात स्थापना करण्यात आली. आज संघटनेच्या महाराष्ट्रासह ५ राज्यात ५ हजार शाखा कार्यरत आहेत. संघटनेचा दरवर्षी वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. संघटनेने यापुर्वी २०१०साली दिल्ली, २०१३मध्ये श्रीलंकेतील कोलंबो येथे तसेच इंग्लंड येथे देखील वर्धापन दिन साजरा केला आहे. यावर्षी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर २८वा वर्धापन दिनाचे परभणी शहरात आयोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
वीरशैव लिंगायत समाज शाखा व उपशाखांतील अनेक प्रश्नांवर शिवा संघटनेने लढा दिला आहे. वीरशैव लिंगायत समाजाच्या महाराष्ट्रातील २४ उपशाखांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले असून याचा जीआर देखील काढण्यात आलेला आहे. यामध्ये २१ उपशाखा ओबीसी मध्ये तर ३ शाखा एसबीसीमध्ये समाविष्ट आहेत. याशिवाय समाजातील इतर उपशाखांचा एस.सी. व एन.टी. मध्ये समावेश करण्यासाठी लढा सुरू असल्याची माहिती यावेळी प्रा. धोंडे यांनी दिली.
तसेच समाजातील युवकांना रोजगार करता यावा यासाठी संघटनेने दिलेल्या लढ्यानंतर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले असून ३२ जिल्ह्यात कार्यालय कार्यान्वित करण्यात आले आहेत. सध्या या महामंडळासाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली असून महामंडळाचे काम सुरू झाले आहे. यामुळे अनेक बेरोजगार युवकांना उद्योग उभारणीसाठी मदत होणार असल्याचे प्रा. धोंडे यानी सांगितले.