परभणी : परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परीसरातील संविधान प्रतिकृतीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ दि.११ रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागल्याने दुकानाच्या तोडफोडीसह जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी ५ गुन्हे दाखल करण्यात आले असून ४१ पुरूषांसह ९ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले होते. या सर्वांना गुरूवारी न्यायालयात हजर केले असता यातील २७ जणांना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
परभणी शहरातील रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परीसरातील संविधान प्रतिकृतीची विटंबना केल्याची घटना दि.१० रोजी घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ दि.११ रोजी बंदचे आवाहन करण्यात आले होते. परंतू या बंदला परभणी शहरात हिंसक वळण लागले. यामध्ये अनेक दुकानांची तोडफोड करण्यासह जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर गुरूवार, दि.१२ रोजी व्यापा-यांनी झालेल्या नुकसानीच्या विरोधात बाजारपेठ बंद ठेवली. तसेच नुकसान भरपाई मिळेपर्यत बाजारपेठ बंदच ठेवणार असल्याचा इशारा दिला होता. दरम्यान सायंकाळच्या सुमारास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शहरातील व्यापा-यांची भेट घेवून नुकसानीचा मावेजा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे महसूल प्रशासनाने गुरूवारी सकाळ पासूनच नुकसानग्रस्त व्यापा-यांच्या दुकानाचे पंचनामे सुरू केले आहेत. त्यामुळे व्यापा-यांनी संयमाची भुमिका घेत शुक्रवार पासून दुकाने सुरू करण्याचार निर्णय घेतला आहे.