मुंबई : लोकसभा निवडणुकीत चुरशीच्या आणि लक्षवेधी ठरलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांचा जवळपास २८ हजार मतांनी पराभव झाला. येथील मतदारसंघातून काँग्रेसचे बळवंत वानखडे विजयी झाले आहेत. त्यामुळे, राणा दाम्पत्यास पराभवाचा मोठा धक्का जनतेने दिला आहे. या निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांनी आज तब्बल २३ दिवसांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अमवरावतीमधील पराभव, स्थानिक राजकारण आणि आगामी निवडणुकांसाठीची तयारी यासंदर्भात भाष्य केले.
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नवनीत राणा पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या आहेत. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आम्ही भेटलो नव्हतो, आमची भेट झाली नव्हती म्हणून आज भेटायला आले होते. लोकसभा निवडणूक कशाप्रकारे झाली, त्या संदर्भात आजच्या बैठकीत बोलणं झालं, अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली. तसेच, मी भाजपची कार्यकर्ता म्हणून काम करणार असून यापुढे पक्षाचं काम करण्याची पद्धत आणि आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कसं काम करायचं, कुठली जबाबदारी पार पाडायची, याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. पार्टीचा पट्टा जेव्हा गळ्यात घातला, त्यांच्यासोबत नक्कीच मी इमानदार राहणार, अशा शब्दांत आपण भाजपातच राहणार असल्याचे राणा यांनी म्हटले.
मी पार्टीची कार्यकर्ता
मला असे वाटते मी पार्टीची कार्यकर्ता आहे, निवडणुकीत कशामुळे माझ्या जनतेने मला अमरावतीमध्ये थांबवले हे सांगणं माझं कर्तव्य आहे. देवेंद्र फडणवीसांना ते सांगणे खूप आवश्यक होतं आणि कुठे काय झालं. माझ्याकडून काय चूक झाली, याबाबत चर्चा केली. देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत, त्यांना भेटून त्यांच्यासोबत चर्चा करून बरं वाटलं. निकालानंतर २३ दिवसांनी मी त्यांना भेटले, असेही राणांनी म्हटले.
यशोमती ठाकूर यांना टोला
मी जे करते ते ओरिजनल आहे, आता ब्रँडला कॉपी करणारे खूप सारे कॉपी घेऊन जातात. पण, ब्रँड हा ब्रँड असतो, असे म्हणत यशोमती ठाकूर यांना टोला लगावला. माझा कोणासोबतही सामना नाही, मी माझ्या जनतेची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात आली आहे. ती सेवा मी शेवटच्या श्वासापर्यंत करणार, असेही राणांनी म्हटले.