नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दूध व्यवसायापासून सुरुवात करत पुढे फायनान्शियल फर्म उभी करणा-या आणि शेवटी ४५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणा-या निर्मल सिंह भंगू यांचा मृत्यू झाला आहे. पर्ल्स ग्रुपचे संस्थापक असलेल्या निर्मल सिंह भंगू यांनी अल्पशा आजारानंतर दिल्लीतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. तिहार तुरुंगात असलेल्या भंगू यांना तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. निर्मल सिंह भंगू यांच्या निधनामुळे साडे ५ कोटी गुंतवणुकदारांच्या अडकलेल्या हजारो कोटी रुपयांचे काय होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
भंगू यांच्या पर्ल्स ग्रुपच्या बचत योजनेमध्ये तब्बल ४५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. या योजनेत पैसे गुंतवणा-या साडे पाच कोटी गुंतवणुकदारांपैकी केवळ २१ लाख लोकांनाच त्यांचा गुंतवलेला पैसा परत मिळाला आहे. उर्वरित सव्वा पाच कोटी गुंतवणुकदार त्यांचे पैसे परत मिळण्याची वाट पाहत आहेत.
पंजाबमधील एका गावात सायकलीवरून दूध विकणा-या भंगू यांनी बघता बघता दोन लाख कोटी रुपयांचे व्यावसायिक साम्राज्य उभे केले होते. घरोघरी दूध विकता विकता जीवनात काही तरी मोठं करण्याच्या इराद्याने ते कोलकाता येथे आले होते. इथे त्यांनी ‘पीरलेस चिटफंड’ कंपनीमध्ये काम केले. तिथे त्यांनी चिटफंड व्यवसायाचे बारकावे शिकले. पुढे वेगवेगळ्या कंपन्यात काम केल्यावर १९८० मध्ये स्वत:ची पर्ल्स गोल्ड फॉरेस्ट लिमिटेड कंपनीची स्थापना केली. त्यामधून गुंतवणुकदारांना आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले. काळाबरोबरच निर्मल सिंह भंगू याचा व्यापार वाढत गेला. मात्र दहा वर्षांपूर्वी २०१३-२०१४ च्या सुमारास पर्ल्स चिटफंड घोटाळ्याचा उलगडा झाला. तसेच ४५ हजार कोटींच्या फसवणुकीचं प्रकरण समोर आलं.