25.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूरपळून गेलेल्या, हरवलेल्या ४ मुली शोधण्यात लातूर पोलिसांना यश

पळून गेलेल्या, हरवलेल्या ४ मुली शोधण्यात लातूर पोलिसांना यश

लातूर : प्रतिनिधी
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने मागील ८ दिवसात धडक मोहीम राबवून पळवून नेले बाबत गुन्हा दाखल असलेल्या ३ मुली व हरविल्याची तक्रार दाखल असलेली १ मुलगी अशा एकूण ४ मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांचे पालकांच्या ताब्यात देण्याची कामगिरी पार पाडली आहे.
बालके, स्त्रिया यांना लैंगिक शोषणासाठी, भीक मागण्यासाठी किंवा इतर बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी पळवून नेले जात असेल किंवा त्यांना फूस लावली जात असेल अशा प्रकरणांना प्रतिबंध करण्यासाठी तसेच पळवून नेलेले बालके, स्त्रिया यांचा शोध घेऊन त्यांचे पालकांच्या ताब्यात देण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे सदर कक्ष कार्यरत आहे. याशिवाय वेश्या व्यवसाय, बालकामगार याप्रकरणी देखील या कक्षाकडून संबंधितावर प्रतिबंध व कारवाई करण्यात येते.
लातूर शहर व जिल्ह्यातील पळवून नेलेले बालके व महिला संदर्भात संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर समांतर तपास करून पीडित महिला व बालकांचा शोध घेऊन तपास केला जातो. मागील ८ दिवसात सदर कक्षाने धडक मोहीम राबवून मागील सुमारे २ वर्षापासून व त्या अलीकडील कार्यकाळात जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल पळवून नेलेल्या ३ मुली व हरविलेली १ मुलगी यांचा शोध घेऊन संबंधित पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे, तर आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरच्या पळवून नेलेल्या मुली पनवेल, नवी मुंबई, उमरगा जि. धाराशिव, नळेगाव जि. लातूर व कसबे तडवळे जि. धाराशिव येवून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. यात तांत्रिक माहिती व विश्लेषणाच्या आधारे सदर मुलींचा शोध घेण्यात यश आले आहे. सदरची कामगिरी सोमय मुंडे, पोलिस अधीक्षक, लातूर, अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, लातूर, गजानन भातलवंडे, पोलिस उपअधिक्षक, मुख्यालय यांच्या मार्गदर्शनात दयानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक,  अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, पोलीस अंमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, मनियार, महिला अंमलदार चंगे व लता गिरी यांच्या पथकाने पार पाडली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR