इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानाच्या सागरी हद्दीत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे मोठे साठे सापडल्याची बाब समोर आली आहे. हे साठे इतके मोठे आहेत की, यामुळे पाकिस्तानचे नशिब बदलू शकते. ‘डॉन न्यूज’ टीव्हीने एका वरिक्ष अधिका-याच्या हवाल्याने तेल आणि गॅसचे साठे सापडल्याची माहिती दिली आहे. यासाठी एका सहकारी देशाच्या मदतीने तीन वर्षांपासून सर्वेक्षण करण्यात आले होते.
अखेर या भौगोलिक सर्वेक्षणात तेलाचे साठे सापडले असून याबद्दल संबंधित विभागांकडून सरकारला माहिती देण्यात आल्याचे देखील सांगण्यात आले आहे. अधिका-याने सांगितले की, या साठ्यांचा फायदा घेण्यासाठी बोली आणि अन्वेषण प्रस्तावांचा अभ्यास केला जात आहे. त्यांनी सांगितले की, तेलाच्या विहीरी खोदणे आणि प्रत्यक्षात तेल बाहेर काढण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागू शकते.
अधिका-याने सांगितले की, या संबंधी काम वेगाने पूर्ण केल्यास देशाच्या आर्थिक स्थिती सुधारण्यात मोठी मदत मिळू शकते. काही अंदाजांनुसार पाकिस्तानात सापडलेले हे तेलाचे साठे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तेल आणि गॅसचे साठे आहेत.