मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर दुस-यांदा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्रिपदाची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये नेत्यांना संधी न दिल्यामुळे नाराजीनाट्य सुरू झाले आहे. महायुती सरकारने पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली असून दादा भुसे व भरत गोगावले यांना संधी नसल्याने युतीमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
दरम्यान, सरकार स्थापन होऊन दोन महिने झाल्यानंतर देखील पालकमंत्री जाहीर होत नसल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर काल (दि. १८) रात्री उशिरा पालकमंत्रिपदाची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये मागील महायुती सरकारमध्ये पालकमंत्री असलेल्या मंत्र्यांना संधी नाकारली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये नाराजी आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून महायुतीमध्ये नाराजीचा अक्षरश: पूर आला आहे. महायुतीमध्ये जागावाटप, मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्री अशा सर्वच निर्णयांनंतर अनेक नाराज नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्रिपद जाहीर होताच संधी न मिळालेल्या मंत्र्यांनी आपली नाराज व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटातील अनुभवी नेत्यांना संधी नाकारल्यामुळे शिंदे गटातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काही नेत्यांवर अन्याय झाल्याचे म्हटले आहे.
पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मला तिस-यांदा जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी व मान मिळाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने मला हे पद मिळाले आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. मागील पाच वर्षे या जिल्ह्यात तीन मंत्री होते. परंतु, पालकमंत्रिपद माझ्याकडे होते. या काळात माझ्या हातून काही छोट्या- मोठ्या चुका झाल्या असतील. परंतु, विकासकामे बघून मला ही संधी दिली आहे, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धन्यवाद मानले आहेत.
यांच्यावर निश्चितच अन्याय : गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील म्हणाले की, ‘‘आम्ही तिन्ही मंत्री मिळून जिल्ह्याचा विकास करणार आहोत. आमच्यामध्ये कोणतीही रस्सीखेच नव्हती. मात्र, मंत्री दादा भुसे व भरत गोगावले यांना नक्कीच पालकमंत्रिपद मिळायला हवे होते. तशी आमची इच्छा होती. त्यांच्यावर निश्चितच अन्याय झाला आहे,’ असे स्पष्ट मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे.
शिंदे गटाचे दोन्ही नेते दादा भुसे व भरत गोगावले यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली आहे. दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षणमंत्री विभाग तर फलोत्पादन तथा रोजगार हमी मंत्री म्हणून भरत गोगावले यांना मंत्रिपद देण्यात आलेले आहे. मात्र मंत्रिमंडळामध्ये असून देखील कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आलेले नाही.
रायगडची जबाबदारी अदिती तटकरेंकडे
दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्रिपद मिळावे यासाठी प्रयत्न करत होते. मात्र जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. तर, भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हवे होते. फडणवीस सरकारमध्ये रायगडची जबाबदारी महिला व बाल कल्याण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या अदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यामुळे महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे.