नागपूर : प्रतिनिधी
हिंदू संस्कृतीत एखाद्या व्यक्तीच्या मरणोत्तर पिंडाला शिवून मोक्ष प्राप्त करून देण्यासाठी कावळ्यांचे मोठे योगदान आहे. मात्र, पितृपक्षात पूर्वजांच्या आठवणी व त्यांच्या नैवेद्यासाठी तेवढ्यापुरतेच कावळ्यांचे स्मरण होत आहे. त्यामुळे मानवी स्वार्थामुळे व बदलत्या वातावरणामुळे कावळ्यांच्या संख्येत घट होत आहे. पितृपक्षात कावळा मिळणे कठीण झाले आहे.
दरम्यान, सद्य:स्थितीत पर्यावरणाच्या बदलत्या वातावरणाचा परिणाम कावळ्यांवर झाला असून, कावळा आता ग्रामीण भागातही दिसेनासा झाला आहे. त्यामुळे काव… काव, अशी साद घालूनही न फिरणारा कावळा दुर्मिळ झाला आहे. कावळ्याने पिंडाला किंवा अन्नाला स्पर्श केला म्हणजे मृत व्यक्तीच्या इच्छा पूर्ण झाल्या असे समजले जाते. असेही म्हणतात की मृत व्यक्तीचा आत्मा जेव्हा मोक्षप्राप्तीसाठी तळमळतो त्यावेळी कावळा त्याला स्वर्गाचे द्वार उघडून देतो. तर असा हा कावळा पितृपक्षात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पण, राज्यात अनेक ठिकाणी कावळे गायब आहेत. कावळे कुठे आहेत? हा एकच प्रश्न सारे विचारत आहेत. ही परिस्थिती कायम राहिली तर काही वर्षांनी कावळे डोळ्यांना दिसणार नाहीत, अशी भीती संशोधक आणि पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
उष्टे, शिळे, खरकट्या अन्नावर बिनधास्त ताव मारून गुजराण करीत असल्याने कावळ्यांकडे पर्यावरणाचा सफाई कामगार म्हणून पाहिले जाते. दरम्यान, पिकांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक शेतक-यांकडून रासायनिक खतांचा व औषधांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.
शेतीचे क्षेत्र घटले
जून महिन्यात पेरणी होती. पेरणी करताना कीटक मातीतून वर येतात. कावळ्यांचे ते अन्न असते. सप्टेंबर, ऑक्टोबरदरम्यान पीक हाती येते. ते खाद्य म्हणून उपलब्ध होते. मात्र, काही वर्षांपासून शेतीचे क्षेत्र घटले आहे.
रासायनिक फवारण्यांनी धोका
कीटकनाशकांचाही वापर वाढला आहे. परिणामी, कावळ्यांना सहजासहजी अन्न मिळणे अवघड झाले आहे. शिवाय झाडांची संख्या कमी झाल्याने त्यांना घरटे करण्यास जागा राहिली नाही. यात प्रदूषण वाढले आहे. या सर्वांचा परिणाम कावळ्यांच्या संख्येवर झाला आहे. कावळे बहुतांश वेळेला लिंब, वड अशा देशी झाडांवर घरटे करणे पसंत करतात, पण देशी झाडे दुर्मिळ झाली आहेत.