नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी शेतक-यांसाठी पहिला मोठा निर्णय घेतला आहे. पीएम किसान निधीच्या १७ व्या हप्त्याचे प्रकाशन अधिकृत करणा-या फाइलवर त्यांनी स्वाक्षरी केली. याचा ९.३ कोटी शेतक-यांना लाभ होणार असून २० हजार कोटी रुपयांचे वितरण होईल.
दरम्यान, मोदी ३.० सरकारचा पहिला निर्णय देशातील करोडो शेतक-यांना डोळ्यांसमोर ठेवून घेण्यात आला आहे. तिस-यांदा शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मोदी यांनी काल पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आज नवी दिल्लीत पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी या निर्णयावर स्वाक्षरी केली.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही शेतक-यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत. कृषी क्षेत्रासाठी अधिक काम करत राहू. यापूर्वी, पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, १६ व्या हप्त्याचे पैसे २८ फेब्रुवारी रोजी देशातील कोट्यवधी शेतक-यांच्या बँक खात्यात पाठवले गेले होते.
देशातील शेतक-यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकार पीएम किसान सन्मान निधी योजना राबवत आहे. तथापि, पीएम किसान सन्मान योजनेंतर्गत, ही रक्कम एकरकमी नाही तर २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये शेतक-यांच्या बँक खात्यात पाठवली जाते.