मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. मात्र खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री नाना पेठेत ही घटना घडली.
आंदेकर यांच्यावर गोळीबार करणा-या हल्लेखोराचा पोलिसांकडून शोध घेण्याात येत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर माजी नगरसेवकावर गोळीबार करण्यात आल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधा-यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल केला आहे.
जयंत पाटील यांनी ट्वीट करत म्हटले की,पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पुण्यातील टोळी युध्दाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे देशभर बदनाम होऊ लागले आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधा-यांचा छुपा पाठिंबा आहे का?