लातूर : प्रतिनिधी
शिक्षकांना आपल्या मागणी मान्य करून घेण्यासाठी या पुरोगामी महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन करायला लागत आहे हे दुर्दैवच म्हणावे लागेल, या परिस्थितीत बदल घडणे आता आवश्यक बनले आहे, येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन घडेल आणि आगामी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षकाच्या सर्व मागण्या मान्य केल्या जातील अशी ग्वाही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी शिक्षकांच्या आक्रोश मोर्चा समोर बोलताना दिली.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज बुधवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील लातूर जिल्हा परिषदेच्या गेट समोरील महाराष्ट्र राज्य सर्व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या विराट आक्रोश मोर्चाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षक संघटनेचे लायक पटेल, केशव गंभीरे, संतोष पिट्टलवाड, ज.ल. केंद्रे, साखरे, लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, विलास को -ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेंनटीवन शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, माजी सभापती अजित माने आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी शिक्षक, शिक्षीका मोठया संख्यने उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रातील सावित्रींना रस्त्यावर उतरावे लागेल हे चित्र महारष्ट्राला पाहण्याची वेळ येईल, अशी महाराष्ट्राची अवस्था या महायुती सरकारने केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात परिवर्तन घडल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही. या महायुती सरकारला आता सक्तीच्या रजेवर पाठवावे लागेल, येत्या विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात परिवर्तन घडेल राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तीत्वात आल्यानंतर मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीत शिक्षकांच्या जुनी पेशंन संदर्भात निर्णय आम्ही घेवू व इतर १४ ही शिक्षकांच्या मागण्या मान्य करु असे त्यांनी सांगितले. पुढे बोलतांना ते म्हणाले की, काँग्रेस राजवटीत सुरु झालेल्या शाळा महायुती सरकार बंद करत आहे, त्या आम्ही बंद करु देणार नाही. शिक्षकांना शिकवण्याशिवाय इतर कामे लावण्यात येऊ नयेत. महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी शिक्षक रस्त्यावर आले आहेत, वाडी, तांडा येथे शिकणा-या विद्यार्थांसाठी हा शिक्षकांचा लढा आहे, शिक्षकांच्या मागण्या सरकारने राज्यात आचारसंिहता लागण्यापूर्वी मान्य कराव्यात असे ते म्हणाले.