कोल्हापूर : प्रतिनिधी
न्यायालयाकडून प्रत्येक भारतीयाला अपेक्षा आहेत. सुप्रीम कोर्ट योग्य न्याय देईल ही आम्हाला अपेक्षा आहे. आम्हाला असे वाटते की सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना याची कल्पना आहे. पैशाने सरकार पाडणे हे पुढच्या लोकशाहीसाठी घातक आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट)जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दरम्यान, सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहत आहे. प्रत्येक पक्षाचे नेते आपापल्या परीने राजकीय दौरे करत आहेत. कोल्हापूर दौ-यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, राष्ट्रपती शासन लावले जाईल की नाही माहीत नाही, पण संविधानाच्या कलम १० चा अपमान झाला आहे. हे सगळे आपण रोखले नाही तर ३-४ हजार कोटींमध्ये पुढची सरकार पाडली जातील’असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. ‘निवडणुका पुढे गेल्या, त्याचा अजूनही लोकांच्या मनात राग आहे’ असे आव्हाड म्हणाले.
मालवणात राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मागच्या आठवड्यात कोसळला. या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे अजूनही फरार आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी ‘डॉन’ चित्रपटातील डायलॉग मारला. ‘आपटेको पकडना मुश्किल ही नही नामुमकीन हैं.’ कुठलाही अनुभव नसलेल्या जयदीपला कोणी हे काम दिलं ते लोक देखील तेवढेच दोषी आहेत, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
छ. शाहू महाराजांची शरद पवार यांना साथ
शाहूंचे विचार पाळणारा पक्ष म्हणजे शरद पवार यांचा पक्ष. शाहूंचे ओरिजनल रक्त शरद पवार यांना साथ देणारच असे शरद पवारांच्या कोल्हापूर दौ-यावर आव्हाड म्हणाले. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबद्दलही ते बोलले. ‘‘निवडणुका पुढे जात आहेत. त्यामुळे जागावाटप गणपतीनंतर होईल’’ असे त्यांनी सांगितले.