निलंगा : प्रतिनिधी
आपल्या हाताखाली काम करणा-या प्राध्यापकाकडून हात उसने पैसे घेऊन ते परत न केल्यामुळे प्राचार्यानी प्राध्यापकाची रक्कम व्याजासह तीन महिन्याच्या आत द्यावी असा निकाल निलंगा येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर यांनी दिला आहे. निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाचे तात्कालीन प्राचार्य डॉ. व्ही. एल. एरंडे यांनी आपले कलीग वसंत सोळुंके यांच्याकडून सन २०१६ मध्ये ४ लाख व ३ लाख रुपये मला पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी कमी पडले आहेत म्हणून चेकद्वारे रक्कम घेतली व एक महिन्यात परत करतो असे सांगितले मात्र परतफेडची मुदत संपल्यानंतरही प्राचार्य व्ही. एल. एरंडे यांनी संबंधित प्राध्यापकाचे पैसे परत केले नाहीत. पैशाची मागणी केल्यानंतर ते टाळाटाळ करू लागले हे पाहून प्राचार्य एरंडे यांच्याविरुद्ध दि. १ नोव्हंबर २०१७ रोजी कोर्टात दावा दाखल केला.
सर्व पुरावे दाखल करून दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर न्यायमूर्ती मरलेचा कोर्टासमोर सादर केले असता या प्रकरणाची सर्व पडताळणी करून तात्कालीन प्राचार्य विठ्ठलराव एरंडे यांनी दर साल दर शेकडा २०१६ पासून व्याजासह ही रक्कम तीन महिन्यांमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापक वसंत सोळुंके यांना द्यावी असा आदेश दिला. यावेळी सोळुंके यांच्या वतीने अॅड. यु. एस. जाधव यांनी काम पाहिले.