लातूर : प्रतिनिधी
दीपावलीच्या प्रकाश पर्वाला मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. दीपावलीत दुकाने, घरांना झेंडूच्या फुलांच्या माळा लावून सजवले जाते. परंतू, बाजारपेठेत प्लास्टिकच्या झेंडू फुलांच्या माळा उपलब्ध झाल्याने नैसर्गीक झेंडू फुले कवडीमोल झाले आहेत. शेतक-यांनी मोठ्या कष्टाने झेंडु फुलांची शेती केली. परंतू, या फुलांना बाजारपेठेत भावच मिळत नाही. केवळ १०० रुपये किलो असा दर झेंडूना मिळाल्याने झेंंडूचा सुगंधच कोमेजून गेला. दुसरीकडे बत्ताशे, लाह्यांचा प्रसाद महागला तर विविध फळांचा समावेश असलेले पुजा साहित्य ५० रुपयांना विकण्यात येत आहे.
सण आणि उत्सवांचा हंगाम सुरू झाला की सर्वत्र फुलांचा सुगंध दरवळू लागतो. दीपोत्सवात विशेष म्हणजे लक्ष्मीपूजनाला शेवंती, झेंडू कमळ या फुलांना प्रचंड मागणी असते. गुरूवारी गंजगोलाई,सुभास चौक, छ. शिवाजी महाराज चौक, दयांनद गेट, औसा रोड, अंबाजोगाई रोड आदी शहराच्या भागात झेंडूची फुले विक्रीसाठी आली आहेत. केशरी व पिवळया रंगाच्या झेंडूसाठी १०० रुपये किलो विक्री झाली. व्यापारी, नागरिकांकडून लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असल्याचे दिसून आले. फुलांबरोबरच तयार माळांनाही मागणी होत होती. बाजार समितीत पहाटे जिल्हाभरातून झेंडूच्या फुलांची मोठया प्रमाणावर आवक झाली. गावराण झेंडू, कलकत्ता झेंडू या दोघांनाही समप्रमाणात मागणी होती.
आंब्याची पाने देखील विक्रीसाठी बाजारपेठेत उपलब्ध झालेली होती. सकाळच्या वेळी झेंडूंच्या फुलांचे भाव १२० रुपयांपर्यंत पोहचले होते; परंतु संध्याकाळपर्यंत हे भाव काही प्रमाणात खाली आले होते. फुलांसोबत तयार हार घेण्याकडेही नागरिकांचा कल आहे. लक्ष्मीपूजनासाठी शेवंती, कमळ तर दिवाळी पाडव्याला झेंडूच्या फुलांचे महत्त्व असल्याने तिन्ही फुलांना चांगली मागणी आहे. दस-याच्या तुलनेत फुलांच्या दरात मोठा फरक पडलेला नाही. लक्ष्मीपूजनासाठी कमळाचे फूल शुभ मानले जाते. त्यामुळे कमळाच्या फुलांना देखील मागणी वाढली होती. यात पांढरे गुलाबी कमळ विक्रीस उपलब्ध होते. त्यातल्या त्यात गुलाबी कमळांना मोठयाप्रमाणात मागणी होती. गुलाबी कमळ २० रुपये, तर पांढरे कमळ १० रुपयांना बाजारात उपलब्ध होते.