मुंबई : प्रतिनिधी
देवेंद्र फडणवीस यांनी चार वर्षांपूर्वीची घटना उकरून काढीत माझ्याविरुध्द दिल्लीच्या मदतीने सीबीआय मध्ये गुन्हे दाखल केले आहेत. फडणवीस माझ्या अटकेची वाट पाहत आहेत. मी गृहमंत्री असताना जळगावच्या एका घटनेमध्ये भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी जळगावच्या पोलिस अधिका-यावर दबाव टाकला होता, हा माझ्यावर आरोप आहे असा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
दरम्यान, सीबीआयने भाजप नेते गिरीश महाजन यांना एका गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलिस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा अनिल देशमुखांवर आरोप आहे. तर सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुखांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यावर ट्वीटद्वारे निशाणा साधला आहे.
पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले, माझ्या माहितीनुसार माझ्यावर रेड टाकून मला अटक करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत. ज्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीच्या मदतीने ईडी, सीबीआयला हाताशी धरून महाराष्ट्राचे राजकारण अतिशय खालच्या स्तरावर आणले त्यांना सांगू इच्छितो की, देवेंद्र फडणवीस माझ्या अटकेची वाट पाहत आहेत.
महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे, अशा शब्दांत अनिल देशमुखांनी निशाणा साधला होता.