मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. थोड्याच दिवसांत आचारसंहिता लागणार असून महायुती आणि महाविकास आघाडी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या काही दिवसांपासून वारंवार महाराष्ट्र दौ-यावर येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौ-यावरून शिवसेना ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसल्यानंतर आता भाजप अलर्ट मोडवर आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात यश मिळणे त्यांना आता कठीण वाटत आहे. फडणवीस यांची नकारात्मकता भाजपला बुडवेल की काय? असे त्यांना वाटत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर जसा विश्वास २०१४ आणि २०१९ मध्ये टाकला तसा आता टाकू शकत नाहीत. त्यामुळे स्वत: प्रचार जातीने पाहावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष द्यावे लागत आहे. पंतप्रधान मोदींना सातत्याने राज्यात यावे लागतेय. याकडे आम्ही सकारात्मकरीत्या बघत आहोत, अशी टीका त्यांनी केली आहे.
मोठेपणा मिरवायचा असेल तर मराठी शाळा वाचवा
केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत सुषमा अंधारे म्हणाल्या की, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्यांची मोहीम राबवली होती. राष्ट्रपतींना यासंदर्भात सह्या दिल्या होत्या. शिवसेनेच्या प्रयत्नांना यश मिळालं आहे. सरकारकडून काय अपेक्षा आहे. अभिजात भाषा सरकारमध्ये आहात म्हणून करावी लागली. मोठेपणा मिरवायचा असेल तर मराठी शाळा वाचवा. त्या अदानींच्या घशात जाऊ देऊ नका, असा हल्लाबोल त्यांनी राज्य सरकारवर केला आहे.