लातूर : प्रतिनिधी
हिवाळ्यात इतर फळांसोबतच पपईलाही अनन्यसाधारण महत्व आहे. शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करणारे फळ अशी पपईची ओळख आहे. पपई गरम असते. त्यामुळे हिवाळ्यात पपई खाणे चांगले असते. लातूरच्या फळबाजारात पपईची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. दररोज किमान २० ते २५ टनाची आवक असल्याचे सांगण्यात आले.
शहरातील फळबाजारात कच्चा पपईची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मागील पंधरा दिवसांपासून लातूर, नांदेड, धाराशिव आदी जिल्ह्यांतून पपई बाजारात येत आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पपईला चांगला आधार मिळाला आहे. सध्या शेतक-यांना प्रतिटन १० ते १२ हजार रुपये दर मिळत आहे. चांगल्या प्रतीच्या पपईच्या दरात एक ते दीड रुपयांची प्रतिकिलो तफावत असल्याचे व्यापा-यांकडून सांगण्यात आले.
वाढत्या थंडीत पपई, मोसंबी, संत्री, टरबुजही फळबाजारात आले आहेत. शिवाय पेरुचीही बाजारपेठेत चांगली आवक आहे. हिवाळ्यात उष्ण असलेली पपई किरकोळ बाजारात मात्र चांगलाच भाव खात आहे. ३० ते ४० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री केली जात आहे. फळबाजारात शेतक-यांच्या पपईला प्रतिटन १० ते १२ हजार रुपयांचा दर मिळत आहे. त्यात वाहतूक खर्च, हमाली, आडत्याचे कमिशन वजा होते. त्यामुळे किती नफा शिल्लक राहील, याचे गणित शेतक-यांनाही लवकर जुळत नाही. मात्र दुसरीकडे किरकोळ विक्री करणारे विक्रेते शहराच्या विविध भागांत हातगाड्यांवर ३० ते ४० रुपये प्रतिकिलोप्रमाणे पपईची विक्री करीत आहेत.