24.7 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeराष्ट्रीयफेरपरीक्षा शेवटचा पर्याय

फेरपरीक्षा शेवटचा पर्याय

पेपर लीकची व्याप्ती जाणून घेणार, सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नीट-यूजी २०२४ परीक्षेत पेपर लीक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु केवळ २ विद्यार्थ्यांचा हेराफेरीत सहभाग असल्याचे समोर आल्याने संपूर्ण परीक्षा रद्द करता येत नाही. फेरपरीक्षा घेण्यापूर्वी प्रथम आम्हाला पेपर लीकची व्याप्ती जाणून घ्यायची आहे. २३ लाख विद्यार्थ्यांच्या केसची सुनावणी करीत आहोत. त्यामुळे पेपर लीकच्या आरोपींना ओळखण्यासाठी एनटीए आणि सरकारने आतापर्यंत काय पावले उचलली, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. या केसमध्ये फेरपरीक्षा हा शेवटचा पर्याय आहे, असे सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट केले.

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या नीट-यूजी २०२४ च्या कथित पेपर लीकबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने हे स्पष्ट केले. पेपर लीकच्या आरोपींना ओळखण्यासाठी एनटीए आणि सरकारने आतापर्यंत काय पावले उचलले आहेत, हे जाणून घ्यायचे आहे. पेपर लीकमुळे किती विद्यार्थ्यांचे निकाल रोखण्यात आले, तसेच हे विद्यार्थी कुठे आहेत, आम्ही अजूनही चुकीच्या लोकांचा मागोवा घेत आहोत, लाभार्थी ओळखू शकलो आहोत का, असा सवाल करीत या प्रकरणात जे काही घडले, त्याची देशभरातील तज्ज्ञांच्या समितीमार्फत चौकशी केली जावी, असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीला आपल्या मुलांनी डॉक्टर किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण घ्यावे, असे वाटते. हे गृहीत धरून आम्ही परीक्षा रद्द करणार नाही. या फसवणुकीचा फायदा झालेल्यांची ओळख कशी करणार, आम्ही समुपदेशन होऊ द्यावे का आणि आतापर्यंत काय झाले, असा सवालदेखील न्यायालयाने उपस्थित केला.

३८ याचिकांवर झाली सुनावणी
नीट पेपर लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ३८ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्वच याचिकांवर आज सुनावणी पार पडली. त्यापैकी ३४ याचिका विद्यार्थी, शिक्षक आणि कोचिंग संस्थांनी दाखल केल्या आहेत तर ४ याचिका नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) दाखल केल्या आहेत. ५० हून अधिक पुनर्पपरीक्षेच्या विरोधात याचिका दाखल केल्या आहेत. नीटची परीक्षा ५ मे रोजी झाली होती. यात ५७१ शहरांतील ४ हजार ७५० परीक्षा केंद्रांवर सुमारे २४ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR