23.9 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रबंडखोर बिघडवणार दिग्गजांची गणिते

बंडखोर बिघडवणार दिग्गजांची गणिते

सातारा मतदारसंघातील तिरंगी लढतीकडे लक्ष

सातारा : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील बंडखोर उमेदवारांनी दिग्गजांच्या झोपा उडवल्या आहेत. हे बंडखोर उमेदवार महायुती अथवा महाविकास आघाडी या आघाड्यांच्या विजयाची गणिते बिघडवू शकतात का या प्रश्नाची चर्चा सुरू झाली आहे. पाटण आणि वाई मतदारसंघातील अनुक्रमे सत्यजित पाटणकर आणि पुरुषोत्तम जाधव यांच्या बंडखोर उमेदवारीचा फटका कोणाला बसणार की बंडखोर वरचढ ठरणार या प्रश्नाची उत्सुकता आहे.

सातारा जावली विधानसभा मतदारसंघात एकूण ११ उमेदवार रिंगणात आहेत तरी महायुतीचे भाजपचे उमेदवार आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमित कदम यांच्यामध्ये सरळ लढत होत आहे. येथे सुद्धा रंगतदार लढत होईल अशी अपेक्षा आहे. म्हणूनच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मतदारांना गाफील न राहण्याचे आवाहन करत आहेत.

सातारा व जावली तालुक्यातील शिवसैनिकांची ताकद एकवटल्यास येथेही अमित कदम चमत्कार घडवू शकतात, असा दावा शिवसैनिक करत आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात १५ उमेदवार असून राष्ट्रवादी विरुद्ध भाजप यांच्यात चुरशीची लढत आहे. राष्ट्रवादी पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजपचे मनोज घोरपडे उमेदवार आहेत. यामागे घोरपडे यांनी तब्बल पाच वर्षे मतदारसंघात पायाभरणी केली आहे. त्यामुळे येथील लढतही रंगतदार होणार आहे.

सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघात २१ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीचे जयकुमार गोरे आणि महाविकास आघाडीचे प्रभाकर घार्गे यांच्यातच लढत निर्णायक ठरणार आहे. घार्गे यांच्या मागे अनिल देसाई, प्रभाकर देशमुख यांच्यासह आमचं ठरलंय अशा दिग्गज नेत्यांची फळी उभी असल्याने घारगे तुल्यबळ लढत देतील अशी अपेक्षा आहे. कराड दक्षिण मतदारसंघात हाय व्होल्टेज लढतीचे चित्र आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपच्या अतुल भोसले यांच्यात जोरात टक्कर होत आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला मानणारा आहे. मात्र अतुल भोसले यांनी प्रचंड वातावरणनिर्मिती केली आहे. त्यांच्या प्रचारार्थ दिनांक आठ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होत आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना यंदाची निवडणूक वाटते तितकी सोपी असणार नाही हे दिसत आहे.

वाई मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार असून अपक्ष पुरुषोत्तम जाधव आमदार मकरंद पाटील व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अरुणादेवी पिसाळ यांच्यासह १५ उमेदवार भवितव्य आजमावणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादीत सरळ सरळ लढत असली तरी महायुतीतून जाधवांची बंडखोरी कोणासाठी धोक्याची घंटा ठरणार हे निकालाच्या दिवशी कळेल. खंडाळा तालुक्यातील सुमारे ९२ हजार मतदान हे निर्णायक आहे. जाधव यांनी खंडाळ्याची अस्मिता ही टॅगलाईन वापरून जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

पाटणमधील लढतीला तिसरा कोन
पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे शंभुराज देसाई, शिवसेना ठाकरे पक्षाचे हर्षद कदम आणि अपक्ष उमेदवार सत्यजित पाटणकर यांच्यात प्रमुख लढत आहे. साहेब विरुद्ध सरकार या पारंपरिक लढतीला कदम यांच्या अचानक आलेल्या उमेदवारीचा तिसरा कोन आहे. पाटण मतदारसंघातून सलग दुस-यांदा निवडून देण्याचा इतिहास नसताना गत वेळी शंभुराज देसाई यांनी ही किमया साधली. त्यामुळे त्यांचीही प्रतिष्ठा येथे पणाला लागणार आहे.

नावसाधर्म्याचा कोणाला तोटा?
कोरेगाव मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आणि वंचित आघाडीचे चंद्रकांत कांबळे यांच्यासह १७ उमेदवार रिंगणात आहेत. महेश शिंदे व शशिकांत शिंदे यांच्याच नावाचे उमेदवार असल्यामुळे कदाचित मत विभागणीचा फटका बसू शकतो, अशी भीती आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR