सातारा : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघांत आज मतदान पार पडत आहे. अशातच अनेक मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिन बंद पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
दरम्यान सातारा जिल्ह्यात मतदानाचा हक्क बजावत असताना एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. खंडाळा येथील एका व्यक्तीला मतदान केंद्रामध्ये मतदानाचा हक्क बजावतानाच तीव्र हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
राज्यभरात आज विधानसभा निवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर मोरवे, ता. खंडाळा येथील प्राथमिक शाळेमध्ये प्रशासनाकडून निवडणूक कक्षात मतदान सुरू होते. यावेळी श्याम नानासाहेब धायगुडे (वय ६७) हे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले. ओळखपत्राची पडताळणी झाल्यानंतर ते ईव्हीएम कक्षात पोहोचले. त्यांनी मतदानयंत्राचे बटण दाबले आणि याचवेळी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे ते जागीच कोसळले.
मतदान केंद्रावर कर्तव्यास असलेल्या कर्मचा-यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तीस जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच धायगुडे यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.
मृत धायगुडे हे मुंबई येथे सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) होते. परंतु काही वर्षांपूर्वीच ते आपल्या मूळ गावी म्हणजेच मोरवे, ता. खंडाळा येथे स्थायिक झाले होते. मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी निवडणूक आयोग आवाहन करीत असते. शहरातील उच्चभ्रू व उच्चविद्याविभूषित लोकही मतदानादिवशी मतदानाकडे पाठ फिरवून पर्यटनास निघून जातात. परंतु व्यवसायाने सनदी लेखापाल असलेले व गावाकडे येऊन शेती करीत आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य जगत असलेल्या धायगुडेंना मतदानाचा हक्क बजावतानाच त्यांचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. शेवटी मतदान करतानाच मृत्यू आल्याने, ‘याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा’ या अभंगाचा यानिमित्ताने अनेकांना प्रत्यय आला.