नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सने (जीसीसी) गेल्या पाच वर्षांमध्ये झपाट्याने विस्तार केला आहे.
वर्ष २०३० पर्यंत फॉर्च्यून ५०० कंपन्या म्हणजेच जगभरातील टॉप ५०० कंपन्यांपैकी ७० टक्के कंपन्या भारतात विस्तार करतील. नॅसकॉम आणि जिनोव्ह यांनी जारी केलेल्या ‘इंडिया जीसीसी लॅण्डस्केप रिपोर्ट’ अहवालातून ही माहिती देण्यात आली आहे. भारताचे वाढते वजन, गतिमान आर्थिक विकास, एआय एक्सलन्स सेंटर आदींमुळे या कंपन्या भारतात येण्यास इच्छूक आहेत.
‘जीसीसी’चा विस्तार पुढील काही वर्षांमध्ये देशात मोठी रोजगारनिर्मिती करणार आहे. ‘जीसीसी’मध्ये सध्या १९ लाख कर्मचारी संख्या आहे. २५-२८ लाखांपर्यंत कर्मचारी संख्या पोहोचू शकते.
९ लाख ते ४३ लाख रुपये एवढे वार्षिक वेतन ‘जीसीसी’मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर्सना मिळत आहे. त्यातुलनेत आयटी कंपन्यांमध्ये ६ ते १८ लाख रुपये वार्षिक वेतन मिळत आहे, असे टीमलीजच्या डिजिटल स्किल्स अहवालात म्हटले आहे.