वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात क्रांती घडूनही आणि नवनवीन औषधे विकसित होऊनही देशात आणि जगात रुग्णांची संख्या सतत वाढत असेल तर त्याचे कारण निश्चितच आपल्या जीवनशैलीत समाविष्ट असलेल्या घटकांमुळे आहे, याबाबत आता जागतिक एकमत होऊ लागले आहे. जीवनशैलीबरोबरच आपली हवा, पाणी आणि माती तर प्रदूषित असल्याचा प्रतिकूल परिणाम आरोग्यावर होत आहे. पण आधुनिक जीवन सुखकर करण्यासाठी बाजाराने दिलेले पर्यायही आपल्या जीवनात विष कालवत आहेत. अमेरिकेत झालेल्या ताज्या संशोधनातून असे समोर आले आहे की, आपण पिण्याच्या पाण्यासाठी वापरत असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये तयार होणारे नॅनोप्लास्टिक्स अनेक जीवघेण्या आजारांचे कारण बनत आहेत. आज सोयीसाठी, शाळा, कॉलेज, ऑफिसला जाताना आपण प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन जातो. पण या पाण्यात तयार होणारे प्लास्टिकचे सूक्ष्म कण अनेक आजारांना निमंत्रण देत आहेत.
एका लीटरच्या पाण्याच्या बाटलीमध्ये तीन लाखांहून अधिक प्लास्टिकचे सूक्ष्म कण असल्याचे नव्या अभ्यासातून समोर आले आहे. अमेरिकेतील तीन सॉफ्ट वॉटर विकणा-या कंपन्यांच्या बाटल्यांचे नमुने घेऊन हा अभ्यास करण्यात आला आहे. अशा स्थितीत भारतात विकल्या जाणा-या कमी दर्जाच्या बाटल्यांमुळे हे संकट किती मोठे असू शकते, याचा सहज अंदाज लावता येतो. वास्तविक, संशोधकांचा हा नवीन अभ्यास नॅनोप्लास्टिकवर केंद्रित आहे. नॅनोप्लास्टिक मायक्रोप्लास्टिकपेक्षा खूपच लहान असते प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या जर्नलने यावर प्रकाश टाकणारा सविस्तर अहवाल प्रकाशित केला आहे.
खरं तर, अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बाटलीबंद पाण्यात हे सूक्ष्म कण मोजले आहेत. बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकच्या कणांची संख्या पूर्वीच्या अंदाजापेक्षा शंभर पटीने जास्त असू शकते, असे या अभ्यासात म्हटले आहे. वास्तविक, हे नॅनोप्लास्टिक्स आकाराने इतके लहान असतात क ते आतड्यांमधून आणि फुफ्फुसातून थेट रक्तात प्रवेश करू शकतात. ज्याचा कालांतराने आपल्या हृदय आणि मनावरही परिणाम होऊ शकतो. ते मायक्रोप्लास्टिक्सपेक्षा आपल्या पेशी आणि रक्तामध्ये वेगाने प्रवेश करू शकतात आणि शरीराच्या अवयवांना नुकसान पोहोचवू शकतात. प्लॅस्टिकचे हे सूक्ष्म कण गर्भवतीच्या पोटातील बाळाच्या शरीरातही पोहोचू शकतात, अशी चिंता संशोधकांनी व्यक्त केली आहे.
प्लॅस्टिकमध्ये असलेल्या विषारी कणांमुळे महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होऊ शकतो, अशीही चिंता व्यक्त केली जात आहे. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर प्लास्टिक घातक विष निर्माण करू शकते. इतकेच नाही तर सूक्ष्म कण असलेले पाणी प्यायल्याने मधुमेह होण्याची शक्यता संशोधकांनी मांडली आहे. प्लास्टिकमधील एका रसायनामुळे किशोरवयीन मुलींमध्ये लठ्ठपणा, मधुमेह, प्रजनन विकार आणि वेगवान शारीरिक बदल होऊ शकतात. याशिवाय फॅथालेटस् नावाच्या रसायनांमुळे यकृताचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो आणि पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते. काही रसायने लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीलाही हानी पोहोचवू शकतात. हे धोके लक्षात घेता दैनंदिन व्यवहारात प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टील, काचेच्या किंवा तांब्याच्या बाटल्यांना प्राधान्य देणे सुरक्षित ठरेल. या बाटल्या थोड्या महाग किंवा जड असतील पण त्या आरोग्यासाठी पोषक असतील हे निश्चित.
– प्रा. विजया पंडित