रेणापूर : प्रतिनिधी
एकीकडे शासनाने सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली असली तरी तालुक्यात रेणापूर येथे एकमेव असलेल्या आधारभूत खरेदी केंद्रावर बुधवारी दि .१६ रोजी सांयकाळी बारदना उपलब्ध नसल्याने पुन्हा एकदा सोयाबीनची खरेदी ठप्प झाली आहे. त्यामुळे येथील खरेदी केंद्रावर वाहनाच्या दूरपर्यंत रांगा लागल्या होत्या . बारदाना कधी उपलब्ध होणार याकडे शेतक-याचे लक्ष लागले आहे .
रेणापूर तालुक्यात श्री रेणुका खरेदी विक्री संघाचे एकमेव आधारभूत खरेदी केंद्र आहे. या केंद्रावर ४ हजार १०० शेतक-यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. आठवड्याला या केंद्रावर सहा गाठी बारदाना येत असल्यामुळे हे केंद्र आठवड्यातून फक्त दोन दिवस सुरू असते. पुन्हा बारदाना अभावी खरेदी बंद केली जाते. सोमवारी दि .१४ जानेवारी रोजी या केंद्रावर सहा गाठी म्हणजे ३ हजार पोते ( बारदाना ) शासनाकडून उपलब्ध झाला होता .
हा आलेला बारदाना दि १६ जानेवारी रोजी सांयकाळी संपल्याने सोयाबीन खरेदी ठप्प झाली होती. शासनाच्या या गलथान कारभारामुळे पुरेसा बारदाना उपलब्ध होत नसल्याने वारंवार खरेदी ठप्प होत आहे . त्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी आणलेल्या वाहनाच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. आपल्या सोयाबीनचे माप होण्यासाठी शेतक-यांना थंडीत आपल्या वाहनाजवळ रात्र जागून काढावी लागत आहे तेव्हा शासनाने रेणापूर खरेदी केंद्रावर पुरेसा बारदाना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतक-यातून होत आहे.