21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रबाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीदिनी पोस्टर वॉर

बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीदिनी पोस्टर वॉर

शिंदे सेना, उद्धव सेनेचे एकमेकांवर प्रहार

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला डिवचले आहे. मुंबईतील अनेक मतदारसंघांत दोन्ही गट एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. मुंबईत शिंदे गट आणि ठाकरे गटात पोस्टर वॉर रंगले आहे. या पोस्टरची मुंबईतच नाही तर राज्यभर सोशल मीडियावर पण चर्चा रंगली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा उद्या १८ नोव्हेंबर रोजी थंडावतील. निवडणूक प्रचारातील अंतिम टप्प्यात आज शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतिदिनी शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना समोर आला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचे एक वक्तव्य शिंदे गटाने प्रसिद्ध केले आहे. विविध वृत्तपत्रांत त्याची जाहिरात आणि होर्डिंग लावण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठ्या छायाचित्रासह यामध्ये वाक्य देण्यात आले आहे. ‘मी, माझी शिवसेना कधीच काँग्रेस होऊ देणार नाही.’ असे बाळासाहेबांचे वाक्य प्रसिद्ध करण्यात आले आहे.

तर उद्धव ठाकरे यांनी पण जाहिरात दिली आहे. भीती, भूक, भ्रष्टाचाराचा अंध:कार आता दूर करणार मशाल, असे वाक्य त्यावर लिहिले आहे. त्यात सर्वांत खाली बाळासाहेबांची मशाल असे वाक्य लिहिले आहे. बाळासाहेबांनंतर शिवसेनेची सूत्रं उद्धव ठाकरे यांच्या हातात आली. तर दोन-अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली.

उद्धव ठाकरे यांचे जास्त उमेदवार
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील अनेक आमदार बाहेर पडले. शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे आणि भाजप यांनी महायुतीचे सरकार स्थापन केले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा दोन्ही गटांनी अनेक मतदारसंघांत एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. शिंदे गट महाराष्ट्राच्या निवडणुकीत ८१ ठिकाणी जागा लढवत आहे. तर उद्धव ठाकरे गटाने ९५ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR