बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा ते पाटोदादरम्यानच्या ससेवाडी गावाजवळ पिकअप आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. आणखी काही जण वाहनाखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. या अपघाताचे वृत्त समजताच नेकनूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, रात्री उशिरा तिघांचे मृतदेह बाहेर काढून नेकनूर रुग्णालयात पाठविण्यात आले. प्रल्हाद सीताराम घरत (६३, रा. महाजनवाडी ता. जि. बीड), नितिन प्रल्हाद घरत (४१, रा. महाजनवाडी ता., जि. बीड), विनोद लक्ष्मण सानप (४१, रा. वाघिरा ता. पाटोदा, जि. बीड) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याशिवाय कंटेनरमध्ये मृ्त्यू झालेल्या दोघांची नावे समजू शकलेली नाहीत.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली, तर वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी कटर व इतर साहित्य मागविल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक नितीन गुट्टूरवार यांनी दिली. ट्रक आणि पिकअपमध्ये ससेवाडी गावाजवळ जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रक आणि पिकअपचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. त्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. परंतु काही प्रवासी जखमी झाल्याने आणि त्यातील काही जण गाडीखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रात्री अंधार असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. दरम्यान, अपघाताचे वृत्त कळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. मृत पाचजण महाजनवाडी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.