लातूर : प्रतिनिधी
बीड, परभणी, लातूरसह मराठवाड्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात अलीकडच्या काळातील घडलेल्या घटनांमुळे राज्यातील कायदा आणि सुव्यावस्थेसमोर प्रश्नचीन्ह निर्माण झाले आहे, ही बाब अत्यंत चितांजनक असल्याचे सांगून राज्यात पून्हा सत्तारुढ झालेल्या सरकारने या संदर्भात त्वरीत कार्यवाही करावी, गुन्हेगारांना कठोर शासन होईल हे पहावे, महाराष्ट्रात पुन्हा भयमुक्त, चितामुक्त वातावरण तयार करावे, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे.
संतोष सूर्यवंशीच्या मारेक-याला अटक करावी
विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान गुरुवारी सकाळी विधानसभेत आपातकालीन विषयावर चर्चेत सहभागी होतांना आमदार अमित देशमुख म्हणाले की, परभणी येथे संवीधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यामुळे त्यावर संपूर्ण राज्यात आणि देशात अत्यंत तीव्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत. यात भर म्हणजे या संदर्भाने परभणी येथील आंदोलनात सहभागी झाल्याच्या संशयावरुन अटक झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी या तरुणाचा न्यायलयीन कोठडीत संशयास्पद मृत्यु झाला आहे. पोलीसांनीच माझ्या मुलाला मारहान करुन त्याचा खून केला व नंतर मला फोन केला असा आरोप सोमनाथच्या आईन जाहीररीत्या केला आहे, ही बाब अतीशय गंभीर आहे. महाराष्ट्र पोलीसाच्या प्रतीमेला त्यामुळे धक्का पोहचला आहे. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होवून सोमनाथच्या मारेक-यांना शिक्षा होणे आवश्यक बनले आहे.
संतोष देशमुख खून प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध:
परभणीची घटना घडण्यापुर्वी एक दिवस अगोदर बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील तरुण सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा अमानुष पध्दतीने खून केल्याची घटना घडलेली आहे. त्या भयावह घटनेचे शब्दात वर्णन करणेही शक्य होत नाही, असे सांगून आमदार देशमुख म्हणाले की, या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला आहे. विधानसभेत या प्रकरणावर चर्चा होत असतांना विरोधक आणि सत्ताधारी या दोन्ही बाजू एकाच स्वरूपाची भाषा बोलत आहेत. त्यामुळे वरील दोन्ही प्रकरणात पोलीसाच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झालेला असतांना सरकारकडून निष्पक्ष कठोर कार्यवाहीची महारा्ष्ट्राला अपेक्षा आहे.
बाळू डोंगरे खून प्रकरणी आरोपींना त्वरित अटक करावी
फक्त परभणी व बीड या जिल्ह्यातच कायदा सुव्यवस्था बिघडली आहे असे नव्हे तर मराठवाडयातील सर्व जिल्ह्यात दररोज अशा घटना घडतांना दिसत आहेत. शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखले जाणा-या आणि शांततेसाठी प्रसिध्द असणा-या लातूर जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात अनेक खून, दरोडे, चोरी आणि हत्येच्या घटना घडल्या आहेत. मागच्या आठवाड्यात लातूरात एका खाजगी रुग्णालयात काम करणा-या बाळू डोंगरे या तरुणाचा खून झाला आहे, त्या संदर्भाने आरोप असलेल्या आरोपींना पोलीसांनी अद्याप अटक केलेली नाही. आरोपींचा पोलीसांना खरोखरच शोध लागत नाही का हा प्रश्न सर्वत्र विचारूला जाऊ लागला आहे.
व्यवस्थित तपास होत नसल्यानेच लातूर गुन्हेगारीत वाढ
विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेवर होते. ऐन निवडणुकीच्या दरम्यान ८ आॉक्टोंबर रोजी सांयकाळी लातूरच्या गंजगोलाई या बाजारपेठेच्या परिसरात दोन तरुणावर तीक्ष्ण हत्यारांने वार करण्यात आले. त्यात मोहसीन सय्यद याचा मृत्यु झाला लगेच दुस-या दिवशी सांयकाळी या परिसरात आणखी पैंगबर हाजी मल्लंग सय्यद यांचाही खून झाला. दोन वर्षापुर्वी बाभळगाव येथे बशीर शेख या शेतक-याचा अज्ञात इसमाने खून केला, त्याचाही अद्याप तपास लागलेला नाही, अशा अनेक घटना आहेत. ज्या घटनांचा तपास लागत नाहीत किंवा लावला जात नाही, त्यामुळे दिवसेदिवस गुन्हेगारीत वाढ होत आहे.
भाग्यश्री सुडे खून खटल्यात जलद गती न्यायालयाची पुन्हा मागणी
शिक्षणासाठी पूणे येथे असलेल्या लातूर येथील भाग्यश्री सुडे या विद्यार्थींनीचा खंडणीसाठी अपहरण करुन खून करण्यार आला. त्या प्रकारणात गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी म्हणून शासनाच्या वतीने विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी तसेच या प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी लातूर येथे जलदगती न्यायालयाची स्थापना करावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी पुन्हा एकदा गुरुवारी सभागृहात केली.