मुंबई : प्रतिनिधी
मुस्लिम परीक्षार्थी विद्यार्थिनींना बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नका, अशी मागणी करणारे पत्र मस्त्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी शिक्षणमंत्री दादा भुसेंना लिहिले आहे. आगामी दहावी-बारावीच्या परीक्षांच्या धर्तीवर हे पत्र लिहिण्यात आले आहे. बुरख्यामुळे कॉपीचे प्रमाण वाढण्याची भीती मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली आहे. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे
नितेश राणे म्हणाले, देशामध्ये राहताना इतर धर्मीय विद्यार्थ्यांना जो नियम लागतो तो नियम मुस्लिम विद्यार्थ्यांनी देखील पाळला पाहिजे. बुरखा घालून परीक्षेला बसाल तर त्याचे अनेक धोके आहेत. संबंधित खात्याने या संदर्भात लवकर निर्णय घ्यावा. राज्यात हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे. आता लाड करण्याची गरज नाही.
नितेश राणे पुढे म्हणाले, हा निर्णय २०२४ सालचा आहे. परीक्षेसोबतच मतदानाच्या वेळीही असे प्रकार उघडकीस आलेले आहेत. नेमकी तीच विद्यार्थिनी परीक्षेला आहेत का हे देखील पाहावे लागेल. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनीही आपला धर्म शाळेत आणू नये.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा देण्यास परवानगी, तसेच परीक्षेच्या वेळी आवश्यकता वाटल्यास प्रकरणपरत्वे तपासणीसाठी महिला पोलिस/अधिकारी किंवा शिक्षक कर्मचारी, यांची नेमणूक करण्यात यावी, असे शासन स्तरावरून कळविण्यात आले आहे.
इयत्ता दहावी व बारावी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. शासनस्तरावरून वेळोवेळी सूचना दिल्या जातात. जर, परीक्षार्थींना बुरखा घालून परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात आला तर, एखादी परीक्षार्थी बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा उपयोग करून परीक्षा देत आहे की नाही, हे तपासणे शक्य होत नाही. आकस्मिक प्रसंगी काही आक्षेप उद्भवल्यास सामाजिक तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनेक विद्यार्थ्यांना नुकसान सहन करावे लागेल.