पुणे : वृत्तसंस्था
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बँक घोटाळ्याच्या आरोपांची चांगलीच धास्ती घेतली. यातूनच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला अशी जाहीर कबुली अजित पवारांनी दिली. पिंपरी चिंचवडमधील पीडिसीसी बँकेच्या वाकड शाखेच्या स्थलांतर समारंभात अजित पवार बोलत होते. कायदे इतके कठोर झालेत, हे पाहून मी पण पीडिसीसी बँकेचा राजीनामा देऊन टाकला अशी कबुली अजित पवार यांनी देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
अजित पवार म्हणाले, मी सांगली जिल्ह्याच्या दौ-यावर होतो. माझ्याबरोबर पवार साहेब होते. त्यांच्या हस्ते त्या बँकेचे उद्धाटन झाले. त्या बँकेची अतिशय सुंदर इमारत होती. उद्घाटन केल्यानंतर आम्ही गाडीत बसलो. अन् गाडीत बसताच बँकेला लवकरच टाळे लागणार, असं मी पवार साहेबांना म्हणालो. साहेब म्हणाले, तुला वेड लागलंय का, काहीही कसा बोलत असतो. ते इतकी मोठी लोकं कशी बुडणार बँक? आता आज या बँकेला टाळे लागले, अनेकांचे पैसे बुडाले. अख्खे बोर्ड आज जेलमध्ये आहे.
त्यामुळे हे सगळं पाहून विचार केला की, ३०-३२ वर्षे येथे आहे. आता राजीनामा द्या. आत्ता जर वाटोळे केले तर यांचे जेलमध्ये जाऊ दे.. हे पाहून मी पण पीडीसीसी बँकेचा राजीनामा देऊन टाकला, अशी कबुली अजित दादांनी देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पण असे असले तरी डोळ्यात तेल घालून आपल्याला बँका चालवाव्या लागणार आहेत, असे देखील अजित पवार म्हणाले.