रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील शेतक-यांंना तात्काळ दुष्काळी अनुदान वाटप करावे यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पात तालुका प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारी दि. १२ फेब्रुवारी रोजी प्रकल्पाच्या पाण्यात उतरून अर्धा तास आंदोलन करण्यात आले. वेळीच प्रशासनाने दखल घेत मागण्यांच्या अनुषंगाने आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतले
.
राज्य शासनाने रेणापूर तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर केला मात्र दुष्काळी पाश्वर्भूमीवर काहीच उपाय योजनेची अंमलबजावणी केली नाही तसेच अनुदानाचे वाटप ही करण्यात आले नाही त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक आडचणीत सापडला गेला आहे . तेव्हा तालुक्यातील शेतक-यांना शासनाकडुन देण्यात येणारे दुष्काळी अनुदान व दुष्काळी उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी दि ३१ जानेवारी प्रहार संघटनेच्या वतीने तहसिलदारांना निवेदन देण्यात आले होते याबाबत कारवाई न झाल्यास जल समाधी आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही निवेदनात देण्यात आला होता. प्रशासनाकडून या निवेदनातील मागण्या संदर्भात दखल न घेतल्याने सोमवारी दि . १२ रोजी दुपारी १२ च्या सुमारास प्रहार संघटनेच्या वतीने भंडारवाडी ( ता रेणापूर ) येथील रेणा मध्यम प्रकल्पातील पाण्यात उतरून आंदोलन सुरू करण्यात आले .
त्यानंतर नायब तहसिलदार श्रावण उगले मंडळाधिकारी मानिक चव्हाण, कमलाकर तिडके तलाठी गोंिवंद शिंगडे, केंद्रे यांनी आंदोलनस्थळी जावून आपल्या मागण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. आंदोलकांनी अर्ध्या तासानंतर हे आंदोलन मागे घेतले . या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले, प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ राठोड, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल गोडभरले, विश्वास कुलकर्णी, सुरज विटकर , दत्ता शिंंदे, चद्रकांत शिंंदे, सचिन राठोड, राहूल गोडभरले, महादू गोडभरले, नवनाथ तिरुके, नितीन कलमे, अतुल राठोड, शरद राठोड, गणेश नाईक, भिमा वाघे, पप्पू जाधव, आमोल राठोड आदी सहभागी झाले होते.