26.1 C
Latur
Saturday, December 14, 2024
Homeराष्ट्रीयभाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांची प्रकृती खालावली

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांची प्रकृती खालावली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली असून त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लालकृष्ण अडवाणी यांना नियमित तपासणीसाठी अपोलो हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. सध्या ते डॉक्टरांच्या निरीक्षणात असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

या वर्षाच्या सुरुवातीलाही ऑगस्ट महिन्यात अडवाणी यांना अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जुलै महिन्यातही देशाचे माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर एम्समध्ये डॉ. अमलेश सेठ यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. त्यावेळी अडवाणींना युरोलॉजी विभागात दाखल करण्यात आले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लालकृष्ण अडवाणी हे गेल्या काही दिवसांपासून आरोग्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. त्याच वर्षी त्यांना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नही देण्यात आला. आरोग्याच्या समस्यांमुळे ते राष्ट्रपती भवनात होणा-या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना त्यांच्या निवासस्थानीच भारतरत्न प्रदान करण्यात आला. ८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी कराची, पाकिस्तान येथे झाला. ८ नोव्हेंबर रोजी अडवाणींनी त्यांचा ९८ वा वाढदिवस साजरा केला. अडवाणींनी १९४२ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मध्ये सामील होऊन स्वयंसेवक म्हणून आपला राजकीय प्रवास सुरू केला. १९८६ ते १९९०, पुन्हा १९९३ ते १९९८ आणि २००४ ते २००५ या काळात ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. अडवाणी हे पक्षाचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिले आहेत. अडवाणी २००२ ते २००४ पर्यंत भारताचे उपपंतप्रधान आणि १९९९ ते २००४ पर्यंत केंद्रीय गृहमंत्री होते. लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मार्चमध्ये अडवाणींना त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन हा सन्मान दिला. या सन्मान सोहळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि अडवाणींचे कुटुंबीय उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR