छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
पावसाळा संपल्यानंतर आता भाजीपाल्यांचे दर वाढू लागले आहेत. रबी पेरणीची तयारी व कांदा लागवड, यामुळे कमी क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड आहे. कोथिंबीर, टोमॅटो, गवार, लसूण, दोडका, कारले, हिरवी मिरची, वांगी, भेंडी अशा भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. तर लसूण ३५० रुपये किलो झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
दरम्यान, यंदा पाऊस जास्त झाल्याने भाजीपाला पिकांचे खूप नुकसान झाले आहे. स्वयंपाकघरात भाज्यांना फोडणी द्यायची म्हटले की जिरे-मोहरी आणि लसूण आवश्यक असतो. परंतु, मागील महिनाभरात लसणाची आवक कमी झाल्याचा थेट परिणाम दरावर झाला आहे. दीड महिन्यापूर्वी अवघ्या १०० ते १३० रुपये किलो दरात मिळणारा लसूण सध्या ३५० रुपये किलोवर पोचला आहे. काही दिवसांत लसणाचे दर झपाट्याने वाढत आहेत. सध्या बाजारात लसणाचा भाव ३५० रुपये किलोपर्यंत आहे.
खराब हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये लसूण पिकाचे नुकसान झाले आहे. लसणाच्या भावात वाढ होण्यामागे हेच प्रमुख कारण सांगितले जात आहे. मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याची नासाडी झाल्यामुळे आणखी काही दिवस महागाईचा सामना करावा लागणार आहे.
कांदा महागला
पावसाने भिजून कांदा खराब झाल्याने कांद्याची आवक कमी झाली असून शेतक-याच्या कांद्याला कमी भाव मिळत असून विक्री मात्र चढ्या भावाने होत आहे.