22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रभ्रष्टाचाराला विरोध करणा-या सनदी अधिका-यांना बदलीची शिक्षा

भ्रष्टाचाराला विरोध करणा-या सनदी अधिका-यांना बदलीची शिक्षा

अमरावती : प्रतिनिधी
कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध करणा-या प्रधान सचिव व्ही. राधा यांची भ्रष्ट महायुती सरकारने बदली केली आहे. भ्रष्टाचार रोखला तर बदलीची शिक्षा मिळेल, असा संदेश या बदलीतून महायुतीने दिला आहे.
प्रामाणिक अधिका-यांचे मनोबल खच्ची करण्याची या सरकारची कार्यपद्धती जुनीच आहे. कृषी विभागातील भ्रष्टाचाराला आळा घालून शेतक-यांचे भले करण्याची या सरकारची मानसिकता नाही. शेतकरीविरोधी सरकार असल्यानेच महायुतीचा कृषी विभाग भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकला आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त करीत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली आहे.

काँग्रेस नेते तथा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार याबाबत म्हणाले की, नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी वाटपाच्या १४०० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला अधिकारी राधा यांनी आक्षेप नोंदवला होता. खतांच्या खरेदीसाठी पीएम प्रणाम योजनेंतर्गत मिळणारे अनुदान हे २५० कोटींपेक्षा जास्त मिळणार नसल्याने ही योजना तूर्तास राबवली जाऊ नये, असे मत राधा यांनी व्यक्त केले होते. शेतकरी सन्मान योजना निधीचा एक हप्ता वळवण्यासही त्यांचा विरोध होता.

या योजनेतील १४०० कोटी वळविण्यालाही त्यांनी विरोध केला. तरी मंत्री कार्यालयाचा निधी वळविण्याचा अट्टाहास होताच. राधा यांनी निविष्ठा खरेदीच्या प्रस्तावाचा दुसरा टप्पाही रोखला होता, अशी माहिती वडेट्टीवार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.

तसेच, फवारणी पंपाच्या खरेदीवर आक्षेप घेतला होता. यात अनियमितता असून चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचा शेरा राधा यांनी संबंधित फाईलवर मारल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महायुती सरकारने अधिकारी राधा यांची बदली केली आहे. कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात शेतक-यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत, हे दुर्दैव असून कृषी खात्यातील वाढलेला भ्रष्टाचार राज्याला डबघाईला आणणारा असल्याचा आरोपच यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR