शिर्डी : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत भाजपचे नेते वसंत देशमुख यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे अहमदनगरमध्ये तणावाचे वातावरण आहे. वसंत देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध करत राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.
यावरून वसंत देशमुखांसह सुजय विखे-पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील आणि भाजपचा निषेध केला जात आहे. यावर आता सुजय विखे-पाटील यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. मला जीवे मारण्याचा कट होता, असा खळबळजनक दावा सुजय विखेंनी केला आहे.
सुजय विखे-पाटील यांनी सांगितले की, सभेतील महिलांबाबतचे वक्तव्य निषेधार्ह आहे. महायुतीच्या वतीने कालही निषेध केला आणि आजही करतो. वसंतराव देशमुख महायुतीचे घटक नाहीत. केवळ त्या गावातील ज्येष्ठ आणि थोरात विरोधक म्हणून स्टेजवर आले होते. त्यांना भाषणाला कोणीही उठवलं नव्हतं तर ते स्वत:हून भाषणाला उठले. भाषण करताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत. अशा प्रकारे खालच्या पातळीची टीका महायुती स्वीकार करत नाही. गुन्हा दाखल झाला असेल तर कारवाई करा, असे देखील आम्ही पोलिसांना सांगितले आहे.