अहमदाबाद : वृत्तसंस्था
बलात्काराच्या गुन्ह्या प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूने शिक्षा रद्द करण्याची मागणी करत गुजरात हायकोर्टामध्ये धाव घेतली. तसेच या प्रकरणात आधीपासूनच बराच काळ तुरुंगात असल्याने आपल्याला झालेली शिक्षा रद्द करावी, अशी मागणी न्यायाधीशांसमोर केली. आसाराम बापूच्या या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीशांनी या अर्जावर विचार करण्यासाठी कुठलाही असामान्य आधार नसल्याचे सांगत तो फेटाळला.
दरम्यान २०२३ मध्ये गांधीनगर येथील एका न्यायालयाने बलात्काराच्या खटल्यामध्ये आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. न्यायमूर्ती इला व्होरा आणि न्यायमूर्ती विमल व्यास यांच्या खंडपीठाने आसाराम बापूची शिक्षा रद्द करून जामीन देण्याची मागणी फेटाळली. तसेच या प्रकरणात आरोपी आसाराम बापू याला कुठलाही दिलासा देता येणार नाही, असे सांगितले. २०१३ मधील एका बलात्काराच्या घटनेप्रकरणी जानेवारी २०२३ मध्ये न्यायालयाने आसाराम बापूला दोषी ठरवले होते. आसाराम बापू याने गांधीनगरमधील आश्रमात एका महिलेवर बलात्कार केला होता, असा आरोप होता. त्यानंतर महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आसाराम बापू याच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली. आसाराम बापू सध्या बलात्कार प्रकरणी जोधपूरमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहे.