28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रमविआचे जागावाटप ठरले!

मविआचे जागावाटप ठरले!

- ठाकरे-काँग्रेसचा फॉर्म्युला फायनल - महायुतीचा गोंधळ कायम

मुंबई : प्रतिनिधी
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमधील तिढा सुटला आहे. उद्धव ठाकरे गटाने परस्पर चार उमेदवार जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती. ठाकरे गटाने उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी काँग्रेसने केली होती. काँग्रेसच्या मागणीला मान देऊन ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या जागेवरून ठाकरे गट निवडणूक लढण्यावर ठाम असून कोकण मतदारसंघातून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडून कोकणामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडणूक लढणार आहे.

महाविकास आघाडीमधील तिढा सोडवण्यासाठी झालेल्या तडजोडीनुसार नाशिकची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला तर कोकणची जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. नाशिकमधून ठाकरे गटाचे उमेदवार अ‍ॅड. संदीप गुळवे निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. नाशिकमधून काँग्रेसचे दिलीप पाटील माघार घेणार आहेत.

तर या मोबदल्यात कोकणामधून ठाकरे गटाचे किशोर जैन माघार घेत आहेत. कोकणातून काँग्रेसचे रमेश कीर निवडणूक लढवणार आहेत. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने ३० जागांवर विजय मिळवल्याने विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीने एकत्र लढावे असे प्रयत्न मागील अनेक दिवसांपासून सुरू होते. या वाटाघाटीमुळे महाविकास आघाडी आता एकत्र निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महायुतीचा गोंधळ कायम
महाविकास आघाडीबरोबरच महायुतीतही विधान परिषद निवडणुकीत मतभेद दिसून येत आहेत. या निवडणुकीत महायुतीतील पक्षांनी आमने-सामने उमेदवार दिले आहेत. भाजपाने विधान परिषदेसाठी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने मित्रपक्षांनी नाराजी व्यक्त केली होती. मुंबई पदवीधर शिंदे गटाचे डॉ. दीपक सावंत आणि भाजपाचे किरण शेलार यांनी अर्ज भरले आहेत. या ठिकाणी शिंदे गटाने माघार घ्यावी यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाचे निरंजन डावखरेंविरोधात शिंदे गटाचे संजय मोरे यांनी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाच्या विरोधात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भावानेच उमेदवारी अर्ज भरला आहे.

मुंबईतही महायुतीचा गोंधळ
नाशिक शिक्षक मतदारसंघातून अजित पवार गटाकडून अ‍ॅड. महेंद्र भावसार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर याच मतदारसंघातून शिंदे गटाच्या किशोर दराडे यांनी अर्ज भरला आहे. या ठिकाणी विखे-पाटील यांच्या सख्ख्या भावाने राजेंद्र विखे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याशिवाय विवेक कोल्हे यांनीही अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे निरंजन डावखरे आणि शिंदे गटाचे संजय मोरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडेंनी अर्ज भरला आहे. तर याच मतदारसंघातून शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे रिंगणात आहेत. भाजपाच्या शिवनाथ दराडे यांनीही या मतदारसंघातून अर्ज भरला आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातही शिंदे गटाचे दीपक सावंत आणि भाजपाचे किरण शेलार आमने-सामने आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR