20.2 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeलातूरमस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या मुलांची काळजी घ्या

मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या मुलांची काळजी घ्या

लातूर : प्रतिनिधी
मस्साजोगचे खून झालेले सरपंच स्व. संतोष देशमुख यांची मुले लातूर येथे शिक्षण घेत आहेत. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये किंवा अडचण येऊ नये  यासाठी त्यांची व्यवस्थित काळजी घ्या, अशा सूचना लातूर येथील शिक्षण संस्थाचालक व मुख्याध्यापक यांना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी दिल्या आहेत.
लातूर येथे ६१ वे राज्यस्तरीय मुख्याध्यापकांचे शिक्षण संमेलन होत आहे. या संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी दि. २६ डिंसेबर रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी आलेल्या शिक्षण संस्थाचालक व मुख्याध्यापक यांच्या शिष्टमंडळासोबत  माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी चर्चा केली. मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांचा अमानुषपणे खून झाल्यानंतर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी २ वेळा मस्साजोग गावात भेट देऊन देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन करून धीर दिला आहे.
या भेटीदरम्यान स्व. संतोष देशमुख यांची मुले लातूर येथे शिक्षण घेत आहेत, त्यांची काळजी घ्या, अशी त्यांनी मागणी केली होती. गुरूवारी शिक्षण संस्थाचालक व मुख्याध्यापक संघाचे शिष्टमंडळ माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी आले असता त्यांच्या सोबत आमदार अमित देशमुख यांनी विस्तृत चर्चा केली, स्व. संतोष देशमुख यांच्या लातूर येथे शिक्षण घेत असलेल्या मुलांची काळजी घेण्याबाबत या शिष्टमंडळाला त्यांनी सूचना केल्या आहेत.
मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांची कन्या वैभवी संतोष देशमुख ही लातूर शहरातील विद्या आराधना क्लासेस येथे वैद्यकीय प्रवेश परीक्षा (नीट) ची तयारी करीत आहे तर मुलगा विराज संतोष देशमुख हा लातूर शहरातील परिमल विद्यालयात इयत्ता सातवीचे शिक्षण घेत आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची संबंधित शिक्षण संस्थाचालकांना  विशेष काळजी घेण्याच्या सूचना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केल्या. या शिष्टमंडळात संस्थाचालक प्रतिनिधी प्रा. गोविंद घार, रामदास पवार, मुख्याध्यापक संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रकाश देशमुख, बजरंग चोले, खंडेराव काळे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR