बारामती : प्रतिनिधी
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला असून महिन्याच्या शेवटी राज्यामध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे. यासाठी महायुती सरकार पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवार यांनी विजयाचा त्रिवार विश्वास व्यक्त केला आहे. तसेच महायुती सरकारमध्ये आपल्याला महत्त्वाचे पद मिळणार असे सूचक विधान अजित पवार यांनी केले आहे.
दरम्यान, तर महाविकास आघाडी पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे महायुतीकडून सत्ता राखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. तर प्रचाराचा जोर देखील वाढला आहे. आता बारामतीमध्ये अजित पवार यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. तासगावमधून अजित पवार यांनी आपल्या प्रचार सभांना सुरुवात देखील केली आहे. त्यावेळी अजित पवार यांनी आपण पुन्हा सत्तेत येणार असल्याचे सूचक विधान केले आहे.
प्रचारावेळी लोकांशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, मागचे झाले गेले आता गंगेला मिळाले. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बारामती तालुक्याचा विकास आणि अधिक फायदा झाला पाहिजे. उद्या काही झाले तरी राज्यात महायुतीचे सरकार येणार… येणार.. येणार. ते सरकार आपल्यानंतर आपल्याला तिकडे चांगले पद मिळणार.. मिळणार..मिळणार…, असे अजित पवार यांनी म्हटले.