मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रात आता देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिस-यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, २२ राज्यांचे मुख्यमंत्री, देशभरातील शेकडो दिग्गज व्यक्ती, साधू-महंत आणि ४० हजार नागरिकांच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध ठिकाणी ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असं लिहिण्यात आलं होतं.
दरम्यान, नव्या सरकारमध्ये देखील जुनाच पॅटर्न कायम ठेवण्यात आला आहे. नव्या सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार का याबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास शिल्लक असेपर्यंत हा सस्पेन्स कायम होता. मात्र भाजप नेते आणि शिवसेना आमदारांच्या मनधरणीला यश आलं. अखेर एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत इतर केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत. तब्बल २२ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली.
या कार्यक्रमात संत-महंतांनी देखील हजेरी लावली. त्यांनी महाराष्ट्राच्या या नव्या सरकारला आशीर्वाद दिले. तसेच क्रिकेट, सिनेक्षेत्रापासून विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करुन आपला ठसा उमटवणा-या दिग्गजांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण होतं. त्यामुळे अशा शेकडो दिग्गज व्यक्तीमत्त्वांनी या भव्य कार्यक्रमाला हजेरी लावली.
या नव्या पर्वात देवेंद्र फडणवीस लाडकी बहीण योजना, जलयुक्त शिवार योजना अशा महत्त्वाकांक्षी योजनांना नवं वळण देतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार कसा मिळेल, राज्यातील विविध भागांमध्ये पाणीटंचाईचं संकट कसं दूर होईल, शेतक-यांना हवा तितका हमीभाव देण्यापासून मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणांच्या मुद्द्यांचं मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असणार आहे.