नाशिक : महाराष्ट्र हे द्राक्ष उत्पादनात देशात अग्रेसर असलेले राज्य आहे. राज्यातून मोठ्या प्रमाणावर इतर देशात द्राक्षाची निर्यातही केली जाते. मात्र, सध्या द्राक्ष निर्यातीला ब्रेक लागला आहे. इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धाची झळ द्राक्ष निर्यातीला बसली आहे.
गाझापट्टीजवळ जहाजांवर झालेल्या हल्ल्यामुळे सुएझ कालवा आणि लाल समुद्रातून होणारी वाहतूक बंद आहे.
दरम्यान, सुएझ कालवामार्गे युरोप देशात जाण्यासाठी सात हजार दोनशे किलोमीटरचे अंतर पार करण्यास २१ दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, नवीन केप ऑफ गुड होपमार्गे गेल्यास हेच अंतर १९ हजार ८०० किमी एवढे होणार असून त्यासाठी किमान ३४ ते ३८ दिवस लागणार आहेत. त्यामुळे अर्थातच आर्थिक फटका मोठ्या प्रमाणावर बसणार असून द्राक्षही खराब होण्याची भीती आहे.
सरकारने यावर काहीतरी तातडीने मार्ग काढावा
दरम्यान, सरकारने यावर काहीतरी तातडीने पाऊले उचलावीत आणि परिस्थिती पूर्वपदावर यावी अशी अपेक्षा शेतक-यांनी व्यक्त केली आहे. कारण यातून मार्ग नाही काढला तर द्राक्ष उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. द्राक्ष खराब होण्याची भीती शेतक-यांनी वर्तवली आहे.