लातूर : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त लातूर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय आणि लातूर आयएमएच्या वुमेन्स डॉक्टर विंगच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘एक धाव स्वत:साठी’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना हस्ते रॅलीला हिरवी झेंडी दाखविण्यात आली.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मंगेश सेलुकर, आयएमएच्या वुमेन्स विंग डॉक्टर विंगच्या अध्यक्ष डॉ. विमल डोळे, सहायक संचालक डॉ. संजय ढगे, डॉ. बालाजी बरुरे, डॉ. सरीता मंत्री, डॉ. क्रांती साबदे, डॉ. मोहिनी गाणु, डॉ. अशोक सारडा, डॉ. श्रीधर पाठक यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी कार्यक्रमाचे नेटक्या आयोजनाबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व वुमेन्स डॉक्टर विंगचे अभिनंदन करताना महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणारे कार्यक्रम सातत्याने राबविणे आवश्यक असल्याचे सांगितले. पुढील काळात आरोग्य विभाग व महीला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात महिलांचे आरोग्य व सक्षमीकरण यासाठी उपक्रम हाती घेण्यात येतील, असे ते म्हणाले.
याप्रसंगी बोलताना डॉ. सरीता मंत्री यांनी महिलांसाठी राबविण्यात येणा-या शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील महिलांपर्यंत सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून सुरु झालेली रॅली ते गंजगोलाई ते परत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये महीला डॉक्टर, महीला कर्मचारी, नर्सीग कॉलेजच्या विद्यार्थिनी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद कलमे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. माधुरी उटीकर, अॅड. मेखले, पुजा पाटील, सुजाता जाधवर, हिराकांत थिटे, कैलास स्वामी, दीपक पवार, अनिल कुंभारे, कपील सर्जे आदींनी परिश्रम घेतले.