पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पलटवार
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लोकसभेत संविधानाच्या ७५ वर्षांच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारच्या निर्णयांची माहिती दिली. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या निर्णयावर टीका केली आणि एका कुटुंबाने संविधानाला धक्का दिला, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना मी संविधानामुळे इथपर्यंत पोहोचलो आहे. संविधानामुळे आमच्यासारखे लोक पंतप्रधान झाले. जवाहरलाल नेहरू यांनी १९५१ मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली. काही लोकांनी अपयशाचे दु:ख प्रकट केले. या देशाच्या जनतेला नमन करतो, ते संविधानासोबत राहिले आहेत, असे मोदी म्हणाले. एका कुटुंबाने गेल्या ५५ वर्षांत संविधानाला धक्का देण्याची एकही संधी सोडली नाही. आणीबाणीच्या काळात देशाला तुरुंग बनवण्यात आले होते, असा आरोपही मोदींनी केला.
जेव्हा देश संविधानाची २५ वर्षे पूर्ण केली, त्यावेळी आमच्या देशात संविधानाला नख लावण्यात आले. पत्रकारितेचे स्वातंत्र्य संपवण्यात आले. हे पाप कधी धुतले जाणार नाही, अशी टीका मोदी यांनी केली. जवाहरलाल नेहरु यांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून मुख्यमंत्र्यांना म्हटले की संविधान आपल्या रस्त्यात आले तर कोणत्याही परिस्थितीत संविधानात बदल करावा लागेल, असे म्हटले होते. काँग्रेसने वेळोवेळी संविधानावर हल्ले केले. ६० वर्षात ७५ वेळा संविधान बदलण्यात आले, असे मोदी म्हणाले.
जवाहरलाल नेहरु यांनी १९५१ मध्ये मागच्या दाराने संविधान बदलले. इंदिरा गांधी यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलला, आणीबाणी लागू करुन अधिकार हिरावून घेण्यात आले. न्यायव्यवस्थेचा गळा घोटण्यात आला, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. एका व्यक्तीने कॅबिनेटचा निर्णय पत्रकार परिषदेत फाडून टाकला. यानंतर कॅबिनेटने त्यांचा निर्णय बदलला. मी जे बोलेन तेच होईल, असे सविधानासोबत होत राहिले, अशी टीकाही मोदींनी केली.
वाजपेयींनी सौदेबाजीऐवजी
संविधानाचा मार्ग स्वीकारला
१९९६ मध्ये सर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजप उदयाला आला. राष्ट्रपतींनी संविधानाच्या भावनेनुसार सर्वांत मोठ्या पक्षाला पंतप्रधान पदाच्या शपथविधीसाठी बोलावले. त्यानंतर १३ दिवस सरकार चालले. जर संविधानाच्या स्पिरिटप्रती आमच्या भावना नसत्या तर आम्हीही सत्तासुख भोगू शकत होतो. पण अटलबिहारी वाजपेयींनी सौदेबाजीचा मार्ग स्वीकारला नाही. संविधानाचा मार्ग स्वीकारला. १३ दिवसांनंतर राजीनामा देणे त्यांनी स्वीकारले, असे मोदी म्हणाले.