रायगड : माथेरानमध्ये पर्यटकांच्या होणा-या फसवणुकीविरोधात पर्यटन बचाव संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. या समितीने आजपासून ‘माथेरान बंद’ची हाक दिली आहे. ‘माथेरान बंद’ला हॉटेल इंडस्ट्रीसह ई-रिक्षा संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे.
माथेरानचे प्रवेश शुल्क जेथे घेतले जाते त्या दस्तुरी नाक्यावर येणा-या पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक केली जाते. याचा येथील सर्वसामान्य कष्टकरी ते हॉटेल इंडस्ट्री या सर्वांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झालेला आहे. माथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणा-या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांची फसवणूक केली जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.
दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले असोत किंवा कुली, रूम्सचे एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये. जागोजागी माहिती फलक लावण्यात यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने मागणी केली होती. ही मागणी पूर्ण झाली नाही तर माथेरान बेमुदत बंद करण्याचा इशाराही या समितीने पोलिस अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी राहुल इंगळे, वनखात्याच्या अधिकारी वर्गाला दिला. पण कुठल्याच प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याने माथेरान बचाव संघर्ष समितीने नाराजी प्रकट केली. १९ दिवसांचा वेळ देऊनही प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याने अखेर नाइलाजास्तव माथेरान बचाव संघर्ष समितीने माथेरान बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून १८ मार्चपासून माथेरान बेमुदत बंद राहणार आहे.