सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघा आठ महिन्यात कोसळल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रामध्ये संतप्त भावना पसरल्या आहेत आज (२८ ऑगस्ट) महाविकास आघाडीकडून राजकोटमध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याच वेळी पाहणी करण्यासाठी आलेले खासदार नारायण राणे आणि कट्टर विरोधक विजय वडेट्टीवार यांचा आमना-सामना झाला.
दरम्यान, महाविकास आघाडीकडून मोर्चा आयोजित करण्यात आल्याने महाविकास आघाडीमधील नेत्यांसह सत्ताधारी महायुतीमधील नेते सुद्धा किल्ल्यावर पोहोचले आहेत. खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी राजकोटवर पोहोचले. या दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सुद्धा पोहोचले. त्यामुळे कधीकाळी सहकारी आणि आता कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार यांनी आमने-सामने आल्यानंतर हस्तांदोलन केले. दरम्यान, माजी खासदार विनायक राऊत यांचे समर्थक सुद्धा राजकोट किल्ल्यावर पोहोचले आहेत.
त्यामुळे नारायण राणे समर्थक आणि विनायक राऊत समर्थक आमने सामने आल्याने राजकोट किल्ल्यासमोर घोषणाबाजी देत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग सुद्धा घडला. महाविकास आघाडीकडून भरड नाका ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा राडा एका बाजूने सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सुद्धा पोहोचले.