मुंडेंच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मुंबई : प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या झाली, त्याचे फोटो पाहून संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. त्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हत्येचा जो मास्टरमाईंड आहे, तोच मंत्र्यांच्या जवळचा असेल तर त्या मंत्र्याने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा. युती असल्याने राजीनामा घेण्यास वेळ लागतो. पण या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जात मुंडेंचा राजीनामा घेतला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या कारणावर भाष्य केले. धनंजय मुंडेंचा राजीनामा योग्यवेळी झाला की अयोग्यवेळी त्याच्या खोलात मी जाणार नाही. राजीनामा पहिल्या दिवशी घ्या किंवा शेवटच्या दिवशी लोकांना बोलायचे ते बोलणारच. ज्या प्रकारे ही हत्या झाली, हत्येचा जो मास्टरमाईंड आहे तोच जर मंत्र्यांच्या एवढ्या जवळचा असेल तर त्या मंत्र्याने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा. पण युती असल्याने वेळ लागला, असे म्हटले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. यानंतर प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. आता सीआयडीने दोषारोपपपत्र दाखल केले. यातून वाल्मिक कराडच मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, देशमुखांच्या निर्घृण हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ माध्यमांसमोर आले. यावरून संतापाची लाट उसळली. यावरून दबाव वाढल्याने मुंडेंनी राजीनामा द्यावा लागला.
दोषारोपपत्रानंतरच मिळाली माहिती
ज्यावेळी देशमुखांच्या हत्येची घटना घडली. त्यावेळी मी सीआयडी चौकशी लावली. त्यांनी खूप चांगला तपास केला. फॉरेन्सिक टीमने हरवलेले मोबाईल आणि डीलिट केलेला डाटा शोधून काढला. हत्येचे जे फोटो समोर आले, ते दोषारोपपत्राचा भाग म्हणून त्यात नमूद आहेत. ज्यादिवशी दोषारोपपपत्र दाखल झाले, तेव्हाच मला तपासाबद्दल माहिती मिळाली, असे फडणवीस म्हणाले.