सर्वच स्वयंपाकघरांत मीठ, साखर हे पदार्थ असतातच. मीठ आणि साखरेशिवाय जेवणाला चवच येत नाही. मिठाचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो तर साखरेचा वापर गोड पदार्थ, चहा-कॉफी बनवण्यासाठी केला जातो. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणा-या पदार्थांमध्ये मीठ-साखरेचा वापर केला जातो पण आता मीठ आणि साखर खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून या पदार्थांमध्ये मायक्रो प्लास्टिकचे कण आढळून आले आहेत म्हणे! भारतातील बाजारपेठेत विकल्या जाणा-या सर्व ब्रँडच्या मीठ आणि साखरेमध्ये मायक्रो प्लास्टिकचे कण आढळून आले आहेत.
‘टॉक्सिक्स लिंक’ या पर्यावरण संशोधन संस्थेने केलेल्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे. यासाठी संस्थेने पांढरे मीठ, सेंद्रीय खडे मीठ, समुद्री मीठ आणि कच्चे मीठ यासह इतर १० विविध घटकांचा अभ्यास केला. तसेच त्यांनी ऑनलाईन आणि बाजारपेठेमधून खरेदी करण्यात आलेल्या साखरेच्या नमुन्यांची तपासणी केली असता त्यात फायबर, पेलेट्स, फिल्म्स आणि इतर तुकडे आढळून आले. मीठ आणि साखरेमध्ये आढळून आलेले मायक्रोप्लास्टिक्स मानवी आरोग्यासाठी घातक आहे ही मोठी चिंतेची बाब असून मायक्रोप्लास्टिक्सचा मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
मीठ आणि साखरेमध्ये सापडलेले प्लास्टिकचे कण अन्न, पाणी आणि हवेतूनही मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. आजकाल लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढत आहे. गंभीर आजारांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, लोक आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये चांगले बदल करीत आहेत. अनेकांनी आपल्या जेवणातील मीठ-साखरेचे प्रमाणही कमी केले आहे. मात्र, साखर-मिठाशी संबंधित एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. त्यानुसार आयोडिनयुक्त मीठ आणि उत्तम दर्जाची साखर विकण्याचा दावा करणा-या बाजारातील नामांकित कंपन्या मानवी आरोग्यासाठी हानीकारक आहेत म्हणे. मायक्रोप्लास्टिक्स हे अत्यंत लहान प्लास्टिकचे कण आहेत. ते इतके बारीक आणि सूक्ष्म असतात की ते सहज डोळ्यांना दिसू शकत नाहीत. प्लास्टिकचे हे कण किती धोकादायक आहेत आणि यामुळे कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो का याबाबत अजून स्पष्टता झालेली नाही. या संदर्भातील काही संशोधनात असे म्हटले आहे की, मायक्रोप्लास्टिकमुळे शरीरात सूज आणि इतर समस्या उद्भवू शकतात.
जेव्हा हे कण शरीरात दीर्घकाळ राहतात तेव्हा ते पेशींना नुकसान पोहोचवू शकतात. त्यासाठी रोजच्या जीवनशैलीतून प्लास्टिकचा वापर करणे टाळावे लागेल. विशेषत: खाद्यपदार्र्थ प्लास्टिकमध्ये ठेवले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. नॉर्मल पाणी पिण्याऐवजी फिल्टर केलेले पाणी प्यायला हवे. प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिणेही टाळावे लागेल कारण यातूनही मायक्रोप्लास्टिकचा धोका उद्भवू शकतो. बाजारातून तयार मसाले विकत घेण्याऐवजी घरीच मसाले बनवणे चांगले. मायक्रोप्लास्टिकचा आकार ०.१ ते ५ मि.मी.पर्यंत नोंदवला गेला आहे. आयोडीनयुक्त मिठातही मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण जास्त आढळून आले. त्यात सूक्ष्म तंतूच्या स्वरूपात सूक्ष्म प्लास्टिक आढळून आले. संशोधनाचा उद्देश मायक्रोप्लास्टिक्सचा डेटाबेस गोळा करणे हा होता. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक करारांतर्गत सर्व संघटनांचे लक्ष या मुद्यावर केंद्रित करता येईल. मायक्रोप्लास्टिकचे धोके कमी करण्याचा त्यांचा उद्देश आहे. राज्यात दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना राज्य सरकारमार्फत महिन्याला मोफत तांदूळ आणि गहू वितरित केले जाते.
मात्र, अलीकडे रेशनवर मिळणा-या तांदळातही प्लास्टिकसदृश तांदूळ मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रेशनवर निकृष्ट दर्जाचा तांदूळ मिळतो असा समज अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. हा तांदूळ खावा की नाही असा प्रश्न केला जात आहे. परंतु रेशनच्या तांदळात असे तांदूळ आढळले तर ते प्लास्टिकचे नव्हे, पौष्टिक तांदूळ आहेत असा खुलासा करण्यात आला आहे. हा तांदूळ शिजवल्यानंतर त्याचे बारीक पीठ होते. त्यामुळे नक्की हा तांदूळच आहे का अशी शंका येणे साहजिक आहे. आता पॅक्ड फूडसाठी (डबाबंद) नवीन नियमानुसार कंपन्यांना ठळक आणि कॅपिटल अक्षरांमध्ये मीठ, साखर आणि चरबीचे प्रमाण घोषित करावे लागणार आहे. पॅक केलेल्या पदार्थासंबंधीची माहिती ठळक अक्षरात आणि ठळक फॉन्टमध्ये दाखवावी लागेल. पॅक केलेल्या खाद्यपदार्थांच्या लेबलवर मीठ, साखर आणि सॅच्युरेटेड फॅटची माहिती देणे अनिवार्य करण्यात येत आहे. बाजारात अशी अनेक उत्पादने विकली जातात जी आरोग्यदायी म्हणून पॅक केली जातात. परंतु त्यात अनेक असे घटक असतात ज्यामुळे ती आरोग्याला नुकसानकारक ठरतात. अलीकडे पिझ्झा, बर्गर आणि कोल्ड्रिंक्स खूप लोकप्रिय बनली आहेत.
जंकफूड हे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. त्यामुळे वजन वाढण्यासोबतच उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या अनेक गंभीर आजारांचा धोका वाढत आहे. अशा पदार्थांच्या अतिसेवनामुळे व्यक्तींमध्ये तणाव आणि चिडचिडेपणाच्या समस्या दिसून येत आहेत. जंकफूडमध्ये शरीरासाठी आवश्यक पोषकतत्वे फार कमी असतात. फायबरचा अभाव आणि साखरेचे प्रमाण जास्त असल्याने रक्तातील साखर वाढते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो तसेच लठ्ठपणाला धोकादायक टप्प्यावर जाण्यास मदत होते. त्यामुळे हे धोकादायक प्रकार टाळण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली धान्ये, फळे यांचा समावेश करणे अत्यंत निकडीचे बनले आहे. बदलती जीवनशैली, पोषक आहाराचा आणि व्यायामाचा अभाव, वाढते ताणतणाव आदी कारणांमुळे आरोग्यविषयक समस्या वाढताना दिसत आहेत. पूर्वी रानमेवा भरपूर प्रमाणात घेतला जायचा, आज त्याचीच गरज आहे.