मुंबई : अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वात मुंबई क्रिकेट संघाने इतिहास घडवला. मुंबईने रणजी ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईने अंतिम सामन्यात विदर्भावर १६९ धावांनी धमाकेदार विजय मिळवला. मुंबईने विदर्भाला विजयासाठी ५३८ धावांचे आव्हान दिले होते.
विदर्भानेही जोरदार फाईटबॅक देत चौथा दिवस खेळून काढला. तर पाचव्या दिवशीही जोरदार सुरुवात केली. लंचनंतर विदर्भाचा कॅप्टन अक्षय वाडकर शतक ठोकून बाद झाला. मुंबईने उपहारानंतर विदर्भाला एक एक करुन झटपट धक्के दिले. तर धवल कुलकर्णी याने आपल्या अखेरच्या सामन्यातील दुस-या डावातील पहिली आणि शेवटची विकेट घेत विदर्भाला ऑलआऊट केले. विदर्भाचा दुसरा डाव १३४.३ ओव्हरमध्ये ३६८ धावांवर आटोपला. मुंबईची ही रणजी ट्रॉफी जिंकण्याची ४२ वी वेळ ठरली.
विदर्भाकडून कॅप्टन अक्षय वाडकर याने सर्वाधिक १०२ धावांची शतकी खेळी केली. मात्र त्याचे शतक व्यर्थ ठरले. करुण नायर याने ७४ धावांची खेळी केली. हर्ष दुबे याने ६५ धावा केल्या. ओपनर अथर्व तायडे आणि ध्रुव शौरी या दोघांनी प्रत्येकी ३२ आणि २८ धावा केल्या. अमन मोखाडे याने ३२ धावांचे योगदान दिले. तर चौघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर आदित्य ठाकरे नॉट आऊट राहिला. मुंबईकडून तनुष कोटीयन याने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. मुशीर खान आणि तुषार देशपांडे या दोघांच्या खात्यात २-२ विकेट्स गेल्या. तर शम्स मुलानी आणि धवल कुलकर्णी याने १-१ विकेट घेतली.
मुंबई प्लेईंग ईलेव्हन : अज्ािंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शम्स मुलाणी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन : अक्षय वाडकर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.