मुंबई : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणा-या पाचही टोल नाक्यांवर लहान मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात आली आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यामुळे मुंबईत येणा-या लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.दरम्यान, आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महायुती सरकारने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय र्वतुळात सुरू झाली आहे.
वाशी, मुलुंड पूर्व-पश्चिम, ऐरोली, दहीसर हे मुंबईतील टोलनाके आहेत. या टोलनाक्यांवरून जाताना लहान वाहनांवर टोलचा भार होता. परंतु, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लहान वाहनांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आज रात्रीपासून लहान वाहनांकडून या पाचही टोलनाक्यांवरून टोल घेतला जाणार नाही. मुंबईत एमएसआरडीसीने ५५ उड्डाणपुलांची उभारणी केली.
या पुलांचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर सर्वप्रथम टोलनाके उभारण्यात आले होते. पुल उभारणीचे काम अंतिम टप्यात येताच टोलनाके उभारण्यासाठी १९९९ मध्ये निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर २००२ मध्ये हे पाचही टोलनाके सुरु करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईमध्ये प्रवेशद्वारावर टोल वसुली सुरू झाली होती. गेल्या २२ वर्षांपासून मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोल आकारण्यात येत आहे.
माज्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला: राज ठाकरे
टोल माफीच्या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली असून, मुंबईत प्रवेश करणा-या पाचही टोल नाक्यांवर आज मध्यरात्रीपासून हलक्या वाहनांना टोलमुक्ती मिळणार आहे. याबद्दल एमएमआर परिसरात राहणा-या सर्व नागरिकांचे अभिनंदन आणि माज्या महाराष्ट्र सैनिकांचे खूप खूप अभिनंदन. टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी, आणि जिथे रस्त्याच्या कामांचे पैसे वसूल झालेत, तिथले रस्ते टोलमुक्त झाले पाहिजेत या मागणीसाठी माज्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रचंड संघर्ष केला. आम्ही टोलनाक्यांची तोडफोड केली यावरून आमच्यावर टीका झाली, पण सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांर्भीय कळत नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.