मुंबई : कोलकात्यातील महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केलेले प्रकरण देशभर गाजत असताना आता मुंबईतील कांदिवलीमधील एका शाळेतील १३ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी एका शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीने शाळेच्या मुख्याध्यापिकेला घडलेला प्रकार सांगितला. यानंतर मुख्याध्यापिकेने पीडित मुलीच्या कुटुंबियांना हा प्रकार सांगून या प्रकरणी कांदिवली पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याअंतर्गत (पॉक्सो) गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार २९ जुलै ते ३० जुलैदरम्यान घडला. मात्र भीतीपोटी पीडित मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. परंतु, इतक्या दिवस पीडिताने याबाबत कोणालाही कसे सांगितले नाही, आरोपी शिक्षकाने तिला कोणत्या प्रकारची धमकी दिली होती का? याचाही तपास केला जात आहे. अल्पवयीन मुलीने आपल्या मुख्याध्यापकांना सांगितले की, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात वर्ग सुटल्यानंतर आरोपी शिक्षकाने तिला हाक मारली होती. त्यानंतर मुख्याध्यापिकेने मुलीच्या पालकांना माहिती दिली आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि मुलीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलमान्वये गुन्हा दाखल केल्याचे कांदिवली पोलिसांनी सांगितले.
शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत-कांदिवली पोलिस
आम्ही मुख्याध्यापक आणि मुलीच्या पालकांचे जबाब नोंदवले असून, या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत. आरोपांची सत्यता शोधण्यासाठी आम्ही शाळेतील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहोत, असे कांदिवली पोलिसांनी माध्यमांना सांगितले.