डेहराडून : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यातील मुन्स्यारी येथे हे लँडिंग झाले आहे. उत्तराखंडचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी विजय कुमार जोगदंडे हेही हेलिकॉप्टरमध्ये होते.
खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले अशी माहिती समोर आली असून, हेलिकॉप्टर शेतात यशस्वीरीत्या उतरविण्यात आले. यामुळे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी मुन्सियारी येथील मिलम येथे ट्रेकिंगसाठी निघाले होते. ते हेलिकॉप्टरने डेहराडूनहून मिलमला रवाना झाले. मात्र हिमालयीन प्रदेशातील खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर पुढे नेणे कठीण झाले आणि मिलमच्या आधी रालम येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.
निवडणूक आयुक्तांनी कालच महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. यासोबतच दोन लोकसभा आणि विविध राज्यांतील ४८ विधानसभा जागांच्या पोटनिवडणुकीची देखील घोषणा करण्यात आली आहे.