ठाणे : प्रतिनिधी
पदे वर-खाली होत असतात. परंतु या राज्यात लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही माझी ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख आणि पद हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदापेक्षा मोठे आहे असे विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
दरम्यान, ठाण्यात सोमवारी रात्री एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. आपली लाडकी बहीण योजना यशस्वी झाली.
विधानसभा निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले आणि महायुतीचे सरकार बहुमताने निवडून आले. आमच्या लाडक्या बहिणींची योजना कधीही बंद होऊ देणार नाही असे शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य मिळत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प राज्यासाठी फायद्याचा आहे. हा अर्थसंकल्प विकसित भारताकडे वाटचाल करणारा आहे. अडीच वर्षांपूर्वी मी मुख्यमंत्रिपदी काम केले. त्यावेळी मी मुख्यमंत्री म्हणजे, कॉमन मॅन असे म्हणायचो. सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केले. आता मी डीसीएम (उपमुख्यमंत्री) आहे.
डीसीएम म्हणजेच, ‘डेडीकेटेड टू कॉमन मॅन’ सर्वसामान्य माणसाला समर्पित असे मी समजतो असेही शिंदे म्हणाले.
यापुढे आणखी काम करायचे आहे. आमच्या विजयात लाडक्या बहिणींचा वाटा महत्त्वाचा आहे. मी पाचव्यांदा निवडणुकीत उभा होतो. या निवडणुकीत मला सव्वा लाख मतांच्या मताधिक्याने निवडून आणले. या निवडणुकीत मिळालेल्या मतदानाच्या ८५ टक्के मतदान या लाडक्या भावाला मिळाले.
पदे येतात-जातात, पदे वर-खाली होतात. परंतु या राज्यात लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख माझी निर्माण झाली आहे. ही ओळख आणि पद हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदापेक्षा मोठे आहे असे मानतो, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली.
क्लस्टर योजना ही महाराष्ट्रात आणली आहे. या माध्यमातून सर्वांना घरे देणारा हा प्रकल्प आहे. माझ्याकडे आता नगरविकास आणि गृहनिर्माण आहे. त्यामुळे आता कोणताही अडथळा यात निर्माण होणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.